प्रभात वृत्तसेवा पिंपरी – शहरात सध्या ऑनलाइन खरेदी आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरीकडे नागरिकांचा कल वाढत आहे. फक्त एका क्लिकवर वस्तू घरपोहच वस्तू आणि जेवण मिळत असल्यामुळे ग्राहक ऑनलाइन प्लॅटफॉर्मकडे वळले आहेत. तसेच एखादी वस्तू एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी पोहचविण्यासाठी अशा तातडीच्या सेवांचा वापर होत आहे. घराच्या किराणापासून वेगवेगळ्या सर्व प्रकारच्या वस्तू आणि जेवणसुद्धा ऑनलाइन मागविले जाते. यामुळे डिलव्हरी या सेवा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात रोजगार आणि व्यवसाय निर्मिती होत आहे. व्यावसायिक स्पर्धेत सर्वांत जलद डिलव्हरी देण्याची कंपन्यांमध्ये स्पर्धा सुरू आहे. या स्पर्धेत डि.िलव्हरी बाॅयना इंसेटिव्हरुपी आमिष वेगाने धावण्यासाठी विवश करते. वेळेशी स्पर्धा करताना जिवाशी खेळ होण्याच्या घटना घडू लागल्या आहेत.फूड डिलिव्हरी कंपन्या ‘दहा मिनिटांत डिलिव्हरी’च्या जाहिराती करत आहेत. तर किराणा दुकानांशी संलग्न झालेल्या कंपन्या ९० मिनिटांत किराणा घरी पोहचविण्याचे आश्वासन देत आहेत. परंतु घड्याळाच्या काट्यावर सुरू झालेली ही स्पर्धा धावपळ, नियमांचे उल्लंघन आणि त्यामुळे होणारे अपघात ाचे कारण बनत आहे. डिलिव्हरी बॉयवर अत्यल्प वेळेत ऑर्डर पोहोचवण्याचे दडपण असते. कंपनीचे अॅप सतत ट्रॅक करत असते की ऑर्डर किती वेळात डिलिव्हर होते. वेळेत डिलिव्हरी झाली नाही तर बोनस रक्कम मिळत नाही, रेटिंग कमी होतं, पुढील ऑर्डर मिळण्यावरही त्याचा परिणाम होतो. याच मानसिकतेतून हे तरुण वाहतूक नियम धाब्यावर बसवून वाहन चालवतात. रस्ते ओलांडताना घाई करणे, वाहतूक सिग्नल तोडणे, एकेरी रस्त्यांवरून उलट दिशेने जाणे, वेग मर्यादा ओलांडणे, असे अनेक प्रकार मोठ्या प्रमाणात दिसून येतात. अपघातांचे वाढते प्रमाण.. अशा वेळी अनेक अपघातांचे प्रमाण झपाट्याने वाढले आहे. काही ठिकाणी डिलिव्हरी बॉय गंभीर जखमी झाले असून, काहींचा दुर्दैवी मृत्यू देखील झाला आहे. अपघातात इतर वाहनचालक आणि पादचाऱ्यांचा जीवही धोक्यात येतो. विशेषतः रात्रीच्या वेळी आणि पावसाळ्यात धोक्याची पातळी आणखी वाढते. पोलिस प्रशासनाची दुहेरी भूमिका.. डिलिव्हरी बॉयला वेळेच्या बंघनात राहून आपली ऑर्डर पूर्ण करायची असते. त्यामुळे नियमांचे उल्लंघन होत असल्याची जाणीव वाहतूक पोलिसांना असूनही अनेक वेळा सहानुभूतीच्या दृष्टीने या तरुणांना फक्त समज देऊन सोडण्यात येते. मात्र यामुळे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढते आणि अनुशासनाचा अभाव जाणवतो. कंपन्यांची जबाबदारी कुठे? या सर्व प्रकारात कंपन्यांची भूमिका अधिक जबाबदारीची असायला हवी. दहा मिनिटांत डिलिव्हरी हे जरी मार्केटिंगचे यशस्वी हत्यार असले, तरी त्यामागचा दबाव जिवाशी खेळतो आहे. नियमांचे उल्लंघन आणि अपघातांचे प्रमाण लक्षात घेत कंपन्यांनी डिलिव्हरी बॉयवरील लादलेले कठोर नियम शिथिल करणे गरजेचे आहे. पालक, समाज आणि ग्राहकांची भूमिका.. या सेवांमध्ये काम करणाऱ्या बहुसंख्य तरुणांची वयोमर्यादा १८ ते ३० दरम्यान असून, ते बहुतेक वेळा शिक्षण घेत आहेत किंवा कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत. पालकांनीही या तरुणांशी संवाद साधून वाहन चालवताना सुरक्षिततेबाबत सजग राहण्याची गरज आहे. तसेच ग्राहकांनीही आपल्या ऑर्डरला वेळ लागला तर संयम बाळगावा, कारण झपाट्याने मिळणाऱ्या सेवेमागे कोणीतरी जिवावर उदार होऊन धावत असतो, हे विसरून चालणार नाही.