Satara | आरोग्य केंद्राच्या गेटवरील झुडपामुळे अपघाताचा धोका

वाठार स्टेशन, (प्रतिनिधी) – वाठार स्टेशन येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या गेटवरील उजव्या बाजूस मोठ्या प्रमाणात झुडपे आली असल्याने दवाखान्यातून रस्त्यावर जात असताना वाहने दिसत नसल्याने या ठिकाणी अपघाताचा धोका निर्माण झाला आहे.
वाठार स्टेशन, ता. कोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्र हे सातारा लोणंद महामार्गालगत आहे. या महामार्गावर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची वर्दळ सुरू असते. तसेच या ठिकाणी वाठार बाजूने सातारकडे जात असताना उतार असल्याने वाहने भरधाव वेगात जात असतात.
सध्या वातावरणातील बदलामुळे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी असते. तसेच वाठार परिसरात एखादा अपघात झाल्यास प्राथमिक उपचार करता या रुग्णालयात दाखल केले जाते. मात्र गंभीर रुग्ण असल्यास पुढील उपचार करता रुग्ण सातारा या ठिकाणी पाठवले जातात.
यावेळी रुग्ण गंभीर असल्याने रुग्णवाहिका चालक लवकर पोहोचण्यासाठी घाईगडबडीत असतात. रुग्णालयाच्या गेटच्या बाहेर उजव्या बाजूस मोठमोठी झुडपे उगवली आहेत. या झुडपांमुळे दवाखान्यातून बाहेर सातारा-लोणंद रस्त्यावर जात असताना येणारी वाहने दिसत नसल्याने मोठी दुर्घटना घडू शकते. संबंधित विभागाने तातडीने या झुडपे काढावीत, अशी मागणी होत आहे.





