satara | वाढत्या तापमानाचा दूध व्यवसायाला फटका

पुसेगाव, {प्रतिनिधी}- वाढत्या तापमानाचा परिणाम शिवारातील हिरव्या चाऱ्यावरही झाला असून दूध व्यवसाय सध्या अडचणीत सापडला आहे. पाणी पातळीत घट झाल्याने दुभती जनावरे जगविण्यासाठी शेतकऱ्यांची धडपड सुरू आहे. खटाव तालुक्यातील अनेक भागात विहिरींसह कूपनलिकांनी तळ गाठल्याने हिरवा चारा दुर्मिळ झाला आहे.
ग्रामीण भागात अनेक गावांत शेतकऱ्यांकडे संकरित गायी वाढल्या. परंतु, उन्हाळ्यात चारा, पाणी समस्येमुळे गायी कमी झाल्या आहेत. लहरी निसर्गामुळे उन्हाळ्यात चाराटंचाई हमखास जाणवते. यंदा तर चाऱ्यासाठी भटकंती करावी लागत आहे. महागडे पशुखाद्य, पाणी, चारा, वैद्यकीय उपचार करत दुभती जनावरे सांभाळणे कठिण बनले आहे.
दुभत्या जनावरांना वेळेवर पुरेसा हिरवा चारा, पाणी दिले तरच दुधाचे प्रमाण टिकून राहते. दूध देणारी जनावरे पोसली जात असली, तरी भाकड झाली तर त्यांना पोसणे मात्र अवघड जाते. शेतीला जोडधंदा म्हणून दुग्धव्यवसाय केला जातो. दरवर्षी उन्हाळ्यात तात्पुरती हिरवा चाराटंचाई निर्माण होते. परंतु, यंदा अल्प पावसामुळे हिरव्या चाऱ्याची समस्या दुग्धव्यावसायिकांना डोकेदुखी ठरत आहे.
या परिस्थितीमुळे पशुधन कमी होत चालले आहे. एरव्ही पावसाळ्यात जनावरे पोसली जात असली तरी उन्हाळ्यात दुभती जनावरे पोसणे अवघड असते. दुधाळ जनावरांच्या वाढत्या किमती, महागडे पशुखाद्य, विकतच्या हिरवा चारा यामुळे दुधाचे दरही वाढले आहेत. अलीकडे जनावरे सांभाळणे अवघड असल्याचे पशुपालकांचे म्हणणे आहे.
हिरवा चारा आणि पाण्यासाठी कसरत
साधारण दरवर्षी पावसाळा सुरू झाल्यावर दुभत्या जनावरांची खरेदी केली जाते. यंदा आहे ती जनावरे कशी पोसायची हा प्रश्र पशुपालकांना सतावत आहे. गायी, म्हशीच्या किमती वाढल्या आहेत, म्हणून दुधाचे वर वाढले आहेत. हे जरी खरे असले तरी विकतचा चारा घेऊन दुभती जनावरे पोसणे अवघड झाल्याचे पशुपालक शेतकरी सांगतात.
दुष्काळी स्थितीमुळे चाऱ्याअभावी दुभती जनावरे सांभाळणे पशुपालकांना अवघड बनले आहे. काही ठिकाणी पाण्याची पातळी खालावली आहे. विहिरींना पाणीच नसल्याने जनावरांना पाणी पाजण्यासाठी पशुपालकाला कसरत करावी लागत आहे.





