निवडक खरेदीमुळे शेअर निर्देशांकांत वाढ

मुंबई –फेडरल रिझर्व्ह मवाळ पतधोरण जाहीर करण्याच्या शक्यतेमुळे जागतिक बाजारातून सकारात्मक संदेश आल्यानंतर भारतीय शेअरबाजारातही मोठ्या प्रमाणात खरेदी झाली आणि निर्देशांकांत दीड टक्क्यांची वाढ झाली.
मंगळवारी मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 558 अंकांनी म्हणजे 1.47 टक्क्यांनी वाढून 38,492 अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअरबाजाराचा निर्देशांक निफ्टी 168 अंकांनी म्हणजे 1.52 टक्क्यांनी वाढून 11,300 अंकांवर बंद झाला.
आज वाहनक्षेत्र, माहिती तंत्रज्ञान, धातू, तंत्रज्ञान इत्यादी क्षेत्रांचे निर्देशांक वाढले. मुख्य निर्देशांक जरी वाढले असले तरी मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये0.75 टक्क्यांपर्यंत घट झाली. याचा अर्थ गुंतवणूकदार निवडक खरेदी करीत असल्याचे दिसून येते. जागतिक आर्थिक परिस्थिती फारशी स्थिर नाही, करोनाचे रुग्ण वाढत असल्यामुळे गुंतवणूकदार सावध आहेत. त्यामुळे पुढील खरेदी किंवा विक्री अल्पप्रमाणात होण्याची शक्यता असल्याचे जिओजि वित्तीय सेवा या संस्थेचे विश्लेषक विनोद नायर यांनी सांगितले.
आजच्या तेजीचे नेतृत्व टीसीएस, कोटक महिंद्रा बॅंक, महिंद्रा, मारुती, बजाज ऑटो या कंपन्यांनी केले. तर आयसीआयसीआय बॅंक, नेस्ले एशियन पेंट्स या कंपन्यांना विक्रीचा मारा सहन करावा लागला.





