मुंबई – भारतीय क्रिकेट संघातील धडाकेबाज खेळाडू ऋषभ पंतच्या गाडीचा काल भीषण अपघात झाला आहे. या अपघातात ऋषभ पंत गंभीर जखमी झाला आहे. दिल्लीहून ऋषभ घरी येत असताना त्याच्या कारला हा भीषण अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. दिल्ली-डेहराडून महामार्गावर रेलिंगला धडकल्यानंतर ऋषभच्या कारला आग लागली. त्यानंतर परिसरातील उपस्थितांनी त्याला गाडीतून बाहेर काढत रुग्णालयात दाखल केले.
या अपघातात ऋषभच्या डोक्याला, पाठीला आणि पायाला गंभीर दुखापत झाली असून, सध्या त्याच्यावर डेहराडूनच्या मॅक्स हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत. आता पर्यंत ऋषभच्या अनेक तपासण्याही झाल्या आहेत. पंतच्या डोक्याला आणि पायाला सर्वाधिक दुखापत झाल्याचे सांगण्यात आले आहे.
त्यामुळे त्याच्या मेंदू आणि मणक्याचे एमआरआय स्कॅनही करण्यात आले असून, त्याचे सर्व रिपोर्ट नॉर्मल आहेत. आज ऋषभचा ताजा अहवाल समोर आला आहे. या अहवालामुळे चाहत्यांना आणि खुद्द पंतला मोठा दिलासा मिळाला असल्याचं दिसून येत आहे. तसेच, वेळ पडल्यास च्यावर प्लास्टिक सर्जरी केली जाणार असल्याचं सुद्धा डॉक्टरांनी सांगितलं आहे.
दरम्यान, अपघातस्थळी असलेल्या प्रत्यक्षदर्शींनी सांगितल्यानुसार, ऋषभची कार रेलिंगला धडकली, ज्यानंतर कारने पेट घेतला. मोठ्या प्रयत्नानंतर कारची आग विझवण्यात यश आले असल्याचे सांगण्यात येत आहे.