महिलांच्या राखीव आसनावर घुसखोरी

पुणे – पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपीएमएल) बसमध्ये महिलांसाठी डाव्या बाजूची आसने राखीव असतात. मात्र, शनिवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास मनपा-आळंदी मार्गावर पीएमपी कर्मचारीच महिलांच्या राखीव आसनावर बसलेले होते. महिलांनी विनंती करून सदर महाशय जागेवरून न उठल्याने काही वयोवृद्ध महिलांनाही उभे राहून प्रवास करावा लागला. या प्रकारामुळे पीएमपी प्रशासनाने संबंधित कर्मचाऱ्यांवर कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

पीएमपीची मनपा ते आळंदी (काटे वस्ती) या मार्गावर रात्रीच्या सुमारास मार्ग क्र. 119 (एमएच-12 आर.एन 5109) ही बस खचाखच भरली होती. यामध्ये, महिलांची संख्या जास्त होती. मात्र, महिलांच्या आरक्षित आसनांवर पीएमपीचे कर्मचारी घुसखोरी करत असल्याचे आढळून आले. सदर प्रकारात वाहकांनेही आसनावर बसलेल्या पीएमपी कर्मचाऱ्याला उठविणे आवश्‍यक होते.

मनपा ते आळंदी मार्गावर सकाळी व सायंकाळच्या सुमारास गर्दी असते. यात महिलांना राखीव आसने मिळणे आवश्‍यक आहे. परंतु, शनिवारी पीएमपी कर्मचारीच महिलांच्या राखीव आसनावर बसलेला होता. या बसमध्ये सीसीटीव्ही असल्याने पीएमपी प्रशासनाने फुटेज तपासून कर्मचाऱ्यावर कारवाई करावी, अशी मागणी तुषार रोकडे या प्रवाशाने केली आहे.

पीएमपीच्या परिपत्रकाला केराची टोपली
पीएमपीत महिलांच्या राखीव आसनावर पुरुष घुसखोरी करत असल्याचे सरार्सपणे दिसून येते. त्यामुळे पीएमपीमध्ये महिलांच्या आरक्षित जागा राखीव ठेवण्याबाबत काही दिवसांपूर्वीच प्रशासनाने पत्रक काढून चालक-वाहकांना सक्‍त ताकीत दिली होती. मात्र, या नियमाची अंमलबजावणी होत नसल्याचे दिसून येते. आता परिपत्रक काढणारेच महिलांच्या आसनावर घुसखोरी करत असल्याने दाद मागायची कुणाकडे? असा प्रश्‍न प्रवाशांना पडला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.