Mumbai CNG Shortage | मुंबई, नवी मुंबई आणि ठाण्यात सीएनजी इंधनाच्या तुटवड्यामुळे नागरिकांचे हाल झाले. रिक्षा, टॅक्सी आणि बससाठी आवश्यक असलेला गॅस न मिळाल्याने ऐन कामाच्या दिवशी मुंबईकरांचा खोळंबा झाल्याचे पाहायला मिळत आहे. तसेच कार्यालये आणि शाळांसाठी बाहेर पडणाऱ्या मुंबईकरांना रस्त्यांवर रिक्षा-टॅक्सी शोधताना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत आहे. सीएनजीच्या तुटवड्यामुळे मुंबईतील अंदाजे ४० ते ४५ टक्के रिक्षा आणि टॅक्सी रस्त्यावर उतरु शकल्या नाहीत. यामुळे बेस्ट बससह सार्वजनिक वाहतूक सेवा विस्कळीत झाली. यामुळे ऐन कामाच्या दिवशी रिक्षा-टॅक्सींच्या संख्येत घट झाली आहे. नेमकं काय आहे कारण? चेंबूरच्या राष्ट्रीय केमिकल अँड फर्टिलायझर कंपाऊंडमधील गॅस अथाॅरिटी ऑफ इंडिया (गेल) मुख्य गॅस पुरवठा वाहिनीचे नुकसान झाले आहे. त्याचा परिणाम महानगर कंपनीच्या सीटी गेट स्टेशनच्या (सीजीएस) गॅस पुरवठ्यावर झाला. त्यामुळे सीएनजी इंधनाचा तुडवडा झाला आणि त्याचा परिणाम ठाणे जिन्ह्यातील नवी मुंबई आणि ठाणे शहरातील विविध सीएनजी पंपावर दिसून येत आहे. महानगर कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार, ठाणे शहरात सीएनजी इंधनावर आधारीत ३१ पंप आहेत. तर नवी मुंबई शहरात ३४ पंप आहेत. रविवारी रात्रीपासून या पंपावर रांगा लागल्या होत्या. काही ठिकाणी महानगर कंपनीने सीएनजीचा पुरवठा विभागणी करुन पुरवठा केला जात होता. परंतु त्याचे प्रमाण कमी होते. तर काही पंपावर पुरवठाच बंद होता. त्यामुळे रिक्षा चालक तसेच इतर वाहन चालकांची सीएनजी पंपावर इंधन मिळावे यासाठी शोधा-शोध सुरु आहे. Mumbai CNG Shortage | सोमवारी तर संपूर्ण दिवस रिक्षा चालक आणि कॅब चालकांना सीएनजी पंपवर रांगा लावून मन:स्ताप सहन करावा लागला. सोमवारी सांयकाळी घरी परताना प्रवाशांना रिक्षा उपलब्ध होऊ शकल्या नाही. त्यामुळे टीएमटीच्या बसगाड्यांवर प्रवाशांचा प्रचंड भार निर्माण झाला होता. बसगाड्या भरून जात असल्याने महिला तसेच इतर वृद्ध प्रवाशांना गर्दीचा सामना सहन करावा लागला. सध्या गेल आणि एमजीएल प्रशासन बिघाड दूर करण्यासाठी युद्धपातळीवर काम करत आहे. सार्वजनिक वाहतूक आणि उद्योगांवर कमीत कमी परिणाम व्हावा यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात आहेत. महानगर गॅस लिमिटेडने मंगळवार दुपारपर्यंत सीएनजी पुरवठा पूर्ववत होण्याची शक्यता वर्तवली आहे. मात्र सीएनजी पुरवठा पूर्ववत होईपर्यंत मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईकरांना आणखी काही काळ त्रास सहन करावा लागण्याची शक्यता आहे. Mumbai CNG Shortage | हेही वाचा: गोळीबार, बॉम्बस्फोट अन् जाळपोळ.. शेख हसिनांच्या फाशीच्या शिक्षेवरून बांगलादेश हिंसाचार