पिंपरी | रिक्षाचालकांकडून अव्वाच्या सव्वा भाड्याची मागणी

पिंपरी, (प्रतिनिधी) – पीएमटी आणि पीसीएमटीच्या विलीनीकरणानंतर अस्तित्वात आलेल्या पीएमपीएमएलचा पिंपरी-चिंचवडला मिळणारा दुजाभाव कायम सुरू आहे. उद्योगनगरी असलेल्या शहराची लोकसंख्या 30 लाखांवर पोचली असली, तरीदेखील रात्रीच्या प्रवासासाठी आजही रिक्षांवर अवलंबून रहावे लागत आहे. पुणे शहरात विविध पाच मार्गांवर सुरू केलेल्या रातराणी बससेवेच्या धर्तीवर शहरातील बसमार्गांची पाहणी करून, याठिकाणीदेखीळ रातराणी बससेवा सुरू करण्याची नितांत गरज आहे.
पीएमपीएमएलच्या स्थापनेनंतर पीएमपीएमएल संचलानातील तूट भरुन काढण्यासाठी दोन्ही महापालिका निधी उपलब्ध करून देतात. मात्र, निधीच्यातुलनेत पिंपरी-चिंचवडला अपुरी बससंख्या व जुन्या बस दिल्या असल्याच्या वारंवार तक्रारी केल्या जात आहेत. तर पुर्वाश्रमीच्या पीसीएमटी कर्मचार्यांनादेखील सापत्नभावाची वागणूक दिली जात असल्याच्या तक्रारींची दखल महाालिकेच्या सर्वसाधारण सभेत घेतली होती. तर अनेक महिने केवळ पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा सुरू करण्यावर चर्चा करण्यात आली.
पिंपरी-चिंचवड शहरात हजारो उद्योगधंदे आहेत. अनेक कंपन्यांचे काम तीन पाळ्यांमध्ये चालते. याशिवाय शिक्षण व नोकरीच्या निमित्ताने राहणार्यांची संख्या मोठी आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी नाशिकफाटा, भोसरी, निगडी येथे एसटी व रेल्वेने बाहेरून येणार्यांची संख्या मोठी आहे. तर अनेक मार्गांवर रात्री नऊ वाजता शेवटची बस धावते.
तर पुणे-मुंबई, पुणे- नाशिक महामार्गावर रात्री बारा वाजेपर्यंत बससेवा उपलब्ध आहे. याशिवाय आळंदीला जाण्यासाठी अनेक भाविक रात्री शहरात येत असतात. त्यानंतर रात्री बारा वाजल्यानंतर उशिरा येणार्या प्रवाशांची रिक्षा चालकांकडून मोठी आर्थिक लूटमार होते. त्यामुळे मध्यरात्री उतरलेले अनेक प्रवासी मार्गावर सुटणार्या पहिल्या बसच्या प्रतीक्षेत असतात.
या मार्गांवर अपेक्षित रातराणी बससेवा
-चिंचवड ते भोसरी,
– नाशिक फाटा ते आळंदी,
– एक्स्प्रेसवेलगत वाकड ते भोसरी (चिंचवडमार्गे)
– पुणे स्टेशन ते आळंदी
– भोसरी ते चाकण





