Richa Chadha: बॉलिवूड अभिनेत्री ऋचा चड्ढा हिला सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे दिल्ली उच्च न्यायालयाने फटकारले आहे. एका विमानातील घटनेबाबत पुरेशी खात्री न करता एका व्यक्तीला ‘छेडछाड करणारा’ असे संबोधल्याबद्दल न्यायालयाने तीव्र नाराजी व्यक्त केली. ही संपूर्ण घटना ११ मार्च रोजी घडलेल्या एका फ्लाइटमधील प्रकरणाशी संबंधित आहे. दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या विमानात एका महिला पत्रकाराने एका प्रवाशावर गैरवर्तनाचा आरोप केला होता. मात्र, संबंधित व्यक्तीने हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. त्याचे म्हणणे आहे की तो संपूर्ण प्रवासात आपल्या सीटवर बसलेला होता आणि उतरतानाही तो झोपलेला होता. या घटनेनंतर सोशल मीडियावर एक पोस्ट व्हायरल झाली, ज्यात त्या व्यक्तीचे नाव, फोटो आणि व्यावसायिक माहिती उघड करण्यात आली. विशेष म्हणजे, एफआयआर नोंद होण्यापूर्वीच त्या व्यक्तीला ‘मॉलेस्टर’ म्हणजेच छेडछाड करणारा असे संबोधण्यात आले. ही पोस्ट अनेक लोकांनी शेअर केली आणि त्यामध्ये ऋचा चड्ढानेही ती पोस्ट रीपोस्ट करत “हे अधिक प्रसिद्ध करा” अशी प्रतिक्रिया दिली. या प्रकरणावर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने स्पष्ट केले की, सोशल मीडियावर तथ्यांची खात्री न करता कोणावर आरोप करणे गंभीर बाब आहे. न्यायमूर्ती विकास महाजन यांनी सांगितले की, या पोस्टमुळे एफआयआरच्या मर्यादांचा भंग झाला आहे आणि संबंधित व्यक्तीला न्याय मिळण्याच्या हक्कावर परिणाम झाला आहे. Richa Chadha न्यायालयाने असेही नमूद केले की, सोशल मीडियावर शेअर करण्यात आलेल्या पोस्टमध्ये त्या व्यक्तीला ‘छेडछाड करणारा’ असे ठळक अक्षरांत लिहिले होते. त्यामुळे त्याची प्रतिमा खराब झाली असून, हा ऑनलाइन मानहानीचा प्रकार ठरू शकतो. यामुळे त्या व्यक्तीला सार्वजनिक अपमान आणि प्रतिष्ठेचे नुकसान सहन करावे लागले. या प्रकरणात संबंधित व्यक्तीने एका पत्रकाराविरोधात, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सविरोधात आणि ऋचा चड्ढासह इतरांविरोधात मानहानीचा दावा दाखल केला आहे. न्यायालयाने यावर प्राथमिक टप्प्यात संबंधित व्यक्तीच्या बाजूने अंतरिम आदेश दिला आहे. न्यायालयाने सोशल मीडियाच्या गैरवापराबाबतही कठोर भूमिका घेतली. “तथ्यांची पडताळणी न करता एखाद्याला दोषी ठरवणे चुकीचे आहे. यामुळे निष्पक्ष सुनावणीच्या अधिकाराचे उल्लंघन होते,” असे न्यायालयाने स्पष्ट केले. या प्रकरणामुळे पुन्हा एकदा सोशल मीडिया वापरताना जबाबदारीने वागण्याची गरज अधोरेखित झाली आहे. कोणतीही माहिती शेअर करण्यापूर्वी तिची खात्री करणे अत्यंत महत्त्वाचे आहे, अन्यथा अशा पोस्ट्समुळे कायदेशीर अडचणी निर्माण होऊ शकतात.