पुणे (प्रतिनिधी) : हिंदुस्थानातील पहिला सार्वजनिक गणपती असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी सार्वजनिक ट्रस्ट’चे बाप्पा शनिवारी मोठ्या जल्लोषात हजारो भाविकांच्या उपस्थितीत ‘वरद विघ्नेश्वर वाड्यात’ विराजमान झाले. प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते दुपारी पावणे एकच्या सुमारास मंत्रोच्चारात ही प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. तत्पूर्वी, बाप्पाची ढोल-ताशा पथकांच्या गजरात मोठ्या थाटामाटात मिरवणूक काढण्यात आली होती, यामध्ये हजारो भाविक सहभागी झाले होते.
सकाळी सव्वा आठच्या सुमारास ट्रस्टचे उत्सव प्रमुख व विश्वस्त पुनीत बालन व जान्हवी धारीवाल – बालन या दांपत्याच्या हस्ते श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाची विधीवत पूजा व आरती झाली. त्यानंतर भवन परिसरात तृतीय पंथीयांचे पथक ‘शिखंडी’ तर्फे दहा मिनिटांचा जोरदार गजर करण्यात आला. यावेळी भवन परिसरातील वातावरण भक्तीमय झाले होते. त्यानंतर गुलाबांच्या रंगी बेरंगी फुलांनी सजविलेल्या पारंपारिक रथात बाप्पाच्या मिरवणूकीला सुरुवात झाली.
छत्रपती शिवाजी महाराज रस्त्यावर ही मिरवणूक आल्यानंतर बाप्पाच्या स्वागताला ढोल-ताशा पथकांनी केलेले वादन आणि ‘श्री शिवाजीराजे मर्दानी आखाडा’ पथकाने मर्दानी खेळाचे केलेले प्रात्यक्षिक प्रत्येक चौकात भाविक भक्तांचे आकर्षण ठरले. लाठी-काठी, तलवार बाजी, दांडपट्टाचे सादरीकरण त्यांच्याकडून करण्यात आले. पुणेकर भाविकांनी ही मिरवणूक पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती.
यंदा गणेशोत्सवाचं १३३ वं वर्ष असून पहिल्यांदाच श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पाच्या मिरवणूक रथाला बैलजोडी लावण्यात आलेली नव्हती. त्याऐवजी रथ हा मंडळाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, बालन दांपत्याने हाताने हा रथ ओढला. मिरवणूक शिवाजी रस्त्यामार्गे बुधवार चौक, तांबडी जोगेश्वरी मंदिर, अप्पा बळवंत चौक, बाजीराव रोड मार्गे पुन्हा ‘वरद विघ्नेश्वर वाडा’, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट येथे आली. त्यानंतर प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या हस्ते श्री गणेशाची विधिवत प्राणप्रतिष्ठा झाली. प्रमुख विश्वस्त व उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. जान्हवी बालन-धारीवाल यांच्या हस्ते ‘श्री’ची आरती करण्यात आली. प्राणप्रतिष्ठेनंतर कैलाश खेर यांनी भाविकांनी केलेल्या मागणीला दाद देत काही गाणी सादर केली. भाविकांनी त्यास जोरदार प्रतिसाद दिला.
मिरवणूकीच्या सुरुवातीला लाठीकाठी, मर्दानी खेळ व शंखनाद झाला. त्यांनतर सात पथकांकडून श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनासमोर ढोल-ताशांची सलामी देण्यात आली. शिवमुद्रा, वाद्यवृंद, मानवंदना, श्री, नु.म.वी, कलावंत, श्रीराम ही ढोल ताशा पथके रंगारी बाप्पाच्या मिरवणूकीत सहभागी झाली होती. त्यांच्या वादनाने मध्यवस्तीतील परिसर दणाणून गेला होता. यावेळी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. यावेळी पद्मश्री कैलाश खेर व पुनीत बालन स्टुडिओज यांची गजवंदना प्रदर्शित करण्यात आली.
‘‘आपण सर्वजण आतुरतेने ज्या दिवसाची वाट बघत असतो तो आजचा सर्वांत आनंदाचा दिवस होता. मोठ्या भक्तीभावाने बाप्पाचं आज आगमन झालं. प्रसिद्ध गायक पद्मश्री कैलाश खेर यांच्या शुभहस्ते बाप्पा प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. संपूर्ण उत्सव काळात वेगवेगळे सामाजिक व धार्मिक कार्यक्रम राबवण्यात येणार आहेत. त्यासाठी आधिकाधिक भाविकांनी बाप्पाच्या दर्शनाचा लाभ घ्यावा, ही विनंती.’’
– पुनीत बालन
(उत्सव प्रमुख व विश्वस्त श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्ट)श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीची प्रतिष्ठापना करण्याचा मान मला मिळाला. माझ्या हस्ते प्राणप्रतिष्ठान म्हणजे मला बाप्पाचा मिळालेला आशीर्वाद वाटतो. आपल्या भारत भूमीला पवित्र आणि अध्यात्मिक बनवा, आम्हाला नैसर्गिक आपत्तींपासून वाचवा आणि आमच्या भूमीला सुरक्षित ठेवा अशी प्रार्थना मी बाप्पाकडे केली.
– कैलाश खेर
(प्रसिद्ध गायक)