मावळात भातपीक जोमात; शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलला

पवनानगर – निसर्गसंपन्न मावळ तालुक्यात यंदा भातपीक जोमात आले असून, शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधानाचे हास्य फुलले आहे. इंद्रायणी भातासाठी प्रसिद्ध असलेल्या मावळला यंदा पावसाचे उत्तम वरदान लाभले आहे. भरपूर पाऊस आणि पोषक हवामानामुळे यंदा सुमारे साडेबारा हजार हेक्टर क्षेत्रावर भातलागवड करण्यात आली असून, पिकांची वाढ समाधानकारक झाली आहे.
पुणे जिल्ह्यातील मावळ, मुळशी, भोर, वेल्हा, खेड, जुन्नर आणि आंबेगाव हे तालुके भात लागवडीसाठी प्रसिद्ध आहेत. यापैकी मावळ हा प्रमुख भात उत्पादक तालुका मानला जातो. मावळमधील अनेक शेतकरी पारंपरिक पद्धतीने भात लागवड करतात, तर काही प्रगतिशील शेतकरी चारसूत्री पद्धतीने लागवड करत आहेत. पावसाचे प्रमाण आणि जमिनीचा पोत या दोन्हींच्या योग्य समतोलामुळे भात उत्पादनास नेहमीच चांगला हातभार लागला
यंदा पावसाने दिलेली साथ आणि योग्य वेळी घेतलेली रोगनियंत्रणाची काळजी यामुळे पीक चांगले उभे राहिल्याचे अनेक शेतकऱ्यांनी सांगितले. काही भागात करपा रोगाने त्रास दिला असला तरी आता पीक तग धरू लागले आहे. आता फक्त पाऊस संतुलित राहिला, तर यंदा उत्पादन विक्रमी होईल, असा विश्वासही शेतकऱ्यांकडून व्यक्त करण्यात आला आहे.
पावसाचे चढउतार आणि करपा रोगाची भिती
यंदा मे महिन्यापासूनच पावसाने हजेरी लावली. मात्र सततच्या पावसामुळे शेतकऱ्यांना रोपवाटिका तयार करण्यात अडचणी आल्या. जून अखेरीस हवामान काहीसे स्थिर झाल्यानंतर शेतकऱ्यांनी रोपवाटिका टाकल्या. जुलैच्या दुसऱ्या पंधरवड्यात झालेल्या पावसामुळे लागवड वेळेवर पूर्ण झाली. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात झालेल्या संतुलित पावसामुळे पिकांना चांगली जोम येऊ लागला. परंतु सप्टेंबरच्या सुरुवातीला सततच्या पावसामुळे भातशेती गारठली होती. त्यातच मध्येच पडणाऱ्या कडक उन्हामुळे काही भागात करपा रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. बदलत्या हवामानामुळे शेतकरी चिंतेत सापडला होता.
पिकांना नवसंजीवनी
सप्टेंबर महिन्याच्या मध्यावर पडलेल्या नियमित पावसामुळे करपा रोगाचा प्रादुर्भाव आटोक्यात आला. परिणामी भातपिके पुन्हा तजेलदार झाली. सध्या बहुतांश शेतांतील पिके हिरवीगार दिसत असून, भाताचे कणसे चांगल्या प्रमाणात भरत आहेत. त्यामुळे यंदा चांगल्या उत्पादनाची आशा शेतकऱ्यांना वाटू लागली आहे.
‘ऑगस्ट महिन्यात जोरदार पाऊस झाल्यामुळे भातपीक चांगले आले होते. मात्र ऑक्टोंबर महिन्याच्या अखेरीस भात पिकावर करपा रोगाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात झाला होता. त्यामुळे हाताशी आलेले पीक वाया जाण्याची भीती वाटत होती. मात्र सप्टेंबरमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे रोगाचा प्रादुर्भाव कमी झाला. आता भातपीक जोमात आले आहे.’ – नवनाथ आडकर, शेतकरी
‘सद्यस्थितीला भातपीक जोमदार आले असून भाताच्या ओंब्या बाहेर पडू लागल्या आहेत. भातपिकासाठी सध्याचा कालावधी महत्वाचा आहे. भातपिकावर तपकिरी तुडतुडे दिसले तर तात्काळ कृषी विभागाच्या सल्ल्याने फवारणी करावी.’- विकास गोसावी, सहाय्यक कृषी अधिकारी, सोमाटणे





