धक्कादायक! आरजी कर हत्याकांडातील दोषीच्या 11 वर्षीय भाचीचा गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला मृतदेह

कोलकाता: पश्चिम बंगालची राजधानी कोलकाता येथे एका धक्कादायक घटनेमुळे खळबळ उडाली आहे. आरजी कर बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी असलेल्या संजय रॉय याच्या ११ वर्षीय भाचीचा मृतदेह संशयास्पद अवस्थेत आढळून आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री अलीपूर येथील विद्यासागर कॉलनीत ही घटना उघडकीस आली. ११ वर्षांच्या मुलीचा मृतदेह एका कपाटात (अलमारीत) गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळला. मृत मुलगी ही आरजी कर बलात्कार आणि हत्या प्रकरणातील दोषी संजय रॉयच्या मोठ्या बहिणीची मुलगी होती.
नेमके काय घडले?
संजयच्या मोठ्या बहिणीच्या निधनानंतर त्याची धाकटी बहीण या मुलीची काळजी घेत होती. नंतर मुलीच्या वडिलांनी संजयच्या धाकट्या बहिणीशी विवाह केला. कुटुंबीयांच्या दाव्यानुसार, रविवारी रात्रीपासून मुलगी बेपत्ता होती. काही वेळाने घराचा दरवाजा आतून बंद दिसल्याने कुटुंबीयांना संशय आला.
वारंवार दरवाजा ठोठावूनही कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने कुटुंबातील सदस्यांनी दरवाजा तोडला. आत गेल्यावर त्यांना दिसले की, मुलीचा मृतदेह कपाटाच्या फ्रेमला लटकलेला आहे आणि तिच्या गळ्यात दोरी बांधलेली आहे. तिला तातडीने एसएसकेएम रुग्णालयात नेण्यात आले, परंतु डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.





