Satara : पर्यावरण संवर्धनासाठी रेवंडे गावाचा पुढाकार

सातारा : परळी खोऱ्यातील निसर्गाच्या कुशीत वसलेल्या रेवंडे ग्रामपंचायतीने पर्यावरण रक्षणासाठी घनकचरा व सांडपाणी समस्येवर विविध उपाय केले आहेत. वैयक्तिक अथवा सार्वजनिक कार्यक्रमात जेवणावळीत थर्माकोल किंवा प्लॅस्टिक आवरण असलेल्या द्रोण- पत्रावळीचा वापर पूर्णपणे बंद केला आहे. सार्वजनिक जेवणावळीत ताट, ग्लास, वाटी याचा वापर करून निसर्गाचा समतोल राखण्याचा प्रयत्न ग्रामस्थांच्यावतीने करण्यात येत आहे.
ग्रामीण भागात भोजनावळीतून भांडी हद्दपार झाली आहेत. विवाह आणि अन्य समारंभात जेवणासाठी पानांच्या पत्रावळीऐवजी थर्माकोलच्या पत्रावळी व प्लॅस्टिकचे ग्लास वापरण्याचे प्रमाण वाढत आहे. समारंभानंतर त्यांची योग्य विल्हेवाट लावली जात नाही. हा सर्व कचरा मोकळ्या जागेत किंवा रस्त्यावर फेकला जातो. त्याचे विघटन होत नसल्याने हवेमार्फत हा हलका कचरा सर्वत्र पसरतो. या पत्रावळ्यांतील अन्न गाय, बैल, कुत्रे यांसारखे पाळीव जनावरे खातात. थर्माकोलचा अंश त्यांच्या पोटात जातो. हे खाऊन जनावरे मृत्युमुखी पडत आहेत. या पत्रावळी जाळल्याने वायू प्रदूषण होते. याचा विचार करुन रेवंडे गावाने पर्यावरण संवर्धनासाठी पुढाकार घेतला.
प्रत्येकाने भांड्याचा वापर केल्यास प्लॅस्टिकच्या द्रोण पत्रावळी पासून मुक्ती मिळेल. त्याचबरोबर घनकचऱ्याची गंभीर समस्या कमी होणार आहे. ग्रामपंचायतीने ताट, वाटी, ग्लास अशी भांडी खरेदी केली आहेत. कार्यक्रमावेळी ही भांडी बचत गटाच्या माध्यमातून लोकांना देण्यात येतात. कार्यक्रम झाल्यानंतर संबंधित व्यक्तीने भांडी स्वच्छ करून पुन्हा बचत गटाकडे जमा करायची असा निर्णय गेल्या दोन वर्षापासून गावात सुरू आहे.
घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापनात सातारा जिल्हा परिषद अग्रेसर राहिली आहे. ना. शिवेंद्रसिंहराजे भोसले व राजू भैय्या भोसले, परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी विश्वास सिद, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी एस. बी. निकम, शंतनू राक्षे यांच्या मार्गदर्शनाखाली सरपंच सौ. मनीषा भोसले, उपसरपंच उषा भोसले, शिवाजी भोसले, वैशाली भोसले, श्रीपती भोसले, शोभा भोसले व ग्रामसेवक बी. डी. बोभाटे यांनी ग्रामस्थ मंडळ मुंबई, ग्रामस्थ मंडळ रेवंडे, बचत गट महिला मंडळ व तरुण मंडळाच्या सहकार्याने रेवंडे गावामध्ये पर्यावरणपूरक उपक्रम राबवून राज्यांमध्ये आदर्श निर्माण केला आहे.
रेवंडे गावची लोकसंख्या ३६९ असून १२२ कुटुंब संख्या आहे. विवाह, वाढदिवस शुभारंभ, लग्नातील धार्मिक विधी, गोंधळ, डोहाळे जेवण, नामकरण विधी, धार्मिक कार्यक्रम पारायण सप्ताह, दुर्गा उत्सव, गणेशोत्सव, श्राद्धाचे जेवण व इतर कार्यक्रमांमध्ये जेवणावळीसाठी अनेकदा प्लॅस्टिकच्या द्रोण, पत्रावळी, डिश याचाच वापर केला जातो. गावातील सर्व नागरिक व कुटुंबांनी एकत्रित येऊन या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा काढला. पर्यावरणस्नेही द्रोण, पत्रावळी, डिश, प्लॅस्टिकमुक्त गाव रेवंडे अशी गामपंचायतीची ओळख होत असल्याचा आनंद आहे.
– सौ. मनीषा भोसले (सरपंच, रेवंडे)





