क्रांतिकारकांचा इतिहास होणार जिवंत; नानावाड्याचे पुनरुज्जीवन

पुणे – पेशवाईची साक्ष असलेल्या ऐतिहासिक नानावाड्यात क्रांतिकारकांचा इतिहास सांगणारे संग्रहालयाचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून, रविवारी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत त्याचे उद्‌घाटन होणार आहे. यानिमित्ताने नागरिकांना नानावाड्याचे केलेले पुनरुज्जीवनही पाहता येणार आहे. मे. लोकस डिझाईन प्रा. लि. यांनी या वाड्याचे पुनरुज्जीवन केले आहे. याशिवाय येथे प्रसंगाचे वर्णन करणाऱ्या चित्रफीतही दाखवण्यात येणार आहे. ही सगळी माहिती अनुभवी इतिहास तज्ज्ञ यांच्याकडून तपासून घेण्यात आल्याची माहिती महापौर मुक्‍ता टिळक यांनी दिली. पाहणी दौऱ्यात हेमंत रासने,ऍड गायत्री खडके, शिवाजी लंके आणि अन्य अधिकारी उपस्थित होते. तसेच लोकस डिझाईन प्रा. लि. चे प्रतिनिधी रोहन पाबळे यांनी या प्रकल्पाविषयी माहिती दिली.

महत्त्वाची ऐतिहासिक नोंद
“न्यू इंग्लिश स्कूल’ची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीला या वाड्यामध्ये त्यांचे वर्ग भरवले जात होते. तसेच विशेष म्हणजे या वाड्यात सर्वात वरच्या मजल्यावर लोकमान्य टिळकांनी खगोलशास्त्राची शाळा (ऑब्झर्वेटरी) बनवली होती. तेथे ग्रहताऱ्यांचा अभ्यास करण्यासाठी आणि पाहणी करण्यात येत होती. याचे कारण म्हणजे त्या काळात ही एकमेव उंच इमारत होती. त्यामुळे ग्रहताऱ्यांना पाहता येणे सोपे होते. पुढील काळात त्याचीही माहिती सर्वसामान्यांना व्हावी यासाठी तेथेही “खगोलशास्त्र शाळेची’ प्रतिकृती उभारण्यात येईल, असे टिळक यांनी सांगितले.

“पुणे दर्शन’मध्ये लवकरच समावेश
“पुणे दर्शन’मध्ये नानावाड्याचा समावेश करणार आहे. तसेच दुसऱ्या टप्प्यात जालियनवाला बाग, गोवा मुक्ती संग्राम, दीव दमण मुक्ती संग्राम आदींचा समावेश करण्यात येणार असल्याचे महापौर मुक्ता टिळक यांनी सांगितले. त्यामुळे पर्यटकांना मोठा खजिना उपलब्ध होणार आहे.

आता या वाड्यात बिटिशकालिन गॉथिक बांधकाम शैलीतील दगडी इमारतीमधील खोल्यांमध्ये स्वातंत्र्य लढ्यात सहभागी असणाऱ्या क्रांतिकारकांची माहिती नागरिकांना व्हावी यादृष्टीने “क्रांतिकारकांचे संग्रहालय’ उभारण्यात आले आहे. त्याच्या पहिल्या टप्प्याचे काम पूर्ण करण्यात आले आहे. त्यामध्ये तळमजल्यावर असलेल्या 11 खोल्यांत रिसेप्शन रूम, उमाजी नाईक, वासुदेव बळवंत फडके, लहुजी वस्ताद या क्रांतिकारकांचे तसेच 1857 चे बंड, आदिवासींचा उठाव, नेमस्तांची चळवळ, बाळ गंगाधर टिळक, चापेकर बंधू, ज्योतिबा-सावित्रीबाई फुले, शाहू महाराज या समाजसुधारकांचे जीवन चरित्र यामध्ये दर्शवण्यात आले आहे. हे काम इतिहास, आर्ट, आर्किटेक्‍चर, स्वातंत्र्यलढा याचा विचार करून करण्यात आले आहे.

अशी आहे वास्तू
नानावाडा ही ग्रेड-1 दर्जाची ऐतिहासिक वास्तू आहे. सन 1740 ते 1750 या काळात पेशव्यांचे मंत्री असलेल्या नाना फडणवीसांनी हा वाडा बांधून घेतला. याचे क्षेत्रफळ सुमारे 2 हजार चौ. मी. आहे. वाड्यामध्ये ब्रिटिशकालिन दगडी इमारत आणि “एल’ आकारातील मूळ पेशवाई वास्तू आहे. सागवानी लाकडातील तुळया, दगडी खांब, दुर्मिळ मेघडंबरी, नाजूक कलाकुसर असलेले फॉलसिलींग, दिवाणखाना, दुर्मिळ भित्तीचित्रे ही या वाड्याची वैशिष्ट्य आहेत. या वास्तूचे जतन महापालिकेने 2010 पासून सुरू केले. पहिल्या टप्प्यात मेघडंबरीची दुरुस्ती, कचेरीचा तळ, पहिला मजला याचे काम पूर्ण करण्यात आले.

Leave A Reply

Your email address will not be published.