Satara: लक्ष्मणतात्या-विलासकाकांच्या विश्वासाच्या नात्याला उजाळा
Satara राजकारणात सत्तेची समीकरणे, पक्ष बदलतात. मात्र, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन, कै. लक्ष्मणतात्या आणि कै. विलासकाका यांची मैत्री होती. आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निवड होण्यात मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांची निर्णायक भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून अॅड. उदयसिंह यांना सहकार क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळण्याबरोबर त्यांचे वडील आणि लक्ष्मणतात्या यांच्या ऋणानुबंधांनाही उजाळा मिळाला आहे.

Satara: जिल्ह्याच्या राजकारणातील दिग्गज नेते कै. लक्ष्मणतात्या पाटील आणि कै. विलासकाका पाटील-उंडाळकर यांचे राजकीय पक्ष वेगळे असूनही, त्यांच्यामध्ये ऋणानुबंध आणि विश्वासाचे नाते होते. कै. विलासकाकांचे चिरंजीव अॅड. उदयसिंह यांची जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी निवड करण्यात निर्णाय भूमिका बजावून, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांनी मैत्रीचा हा वारसा जपला आहे, अशी चर्चा जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात आहे.
राजकारणात सत्तेची समीकरणे, पक्ष बदलतात. मात्र, या सगळ्यांच्या पलीकडे जाऊन, कै. लक्ष्मणतात्या आणि कै. विलासकाका यांची मैत्री होती. आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदी अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांची निवड होण्यात मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांची निर्णायक भूमिका असल्याचे स्पष्ट झाले आहे. यातून अॅड. उदयसिंह यांना सहकार क्षेत्रात नेतृत्वाची संधी मिळण्याबरोबर त्यांचे वडील आणि लक्ष्मणतात्या यांच्या ऋणानुबंधांनाही उजाळा मिळाला आहे.
जिल्हा बँकेचा कारभार पाहत असताना, कै. विलासकाका आणि कै. लक्ष्मणराव पाटील यांची जवळीक अधिक दृढ झाली. या दोघांवरही यशवंतराव चव्हाण आणि किसन वीर यांच्या विचारांचा प्रभाव होता. लक्ष्मणतात्यांनी बोपेगावच्या सरपंचपदापासून वाई पंचायत समिती सभापतिपद, जिल्हा परिषद अध्यक्षपद, किसन वीर सहकारी साखर कारखाना, जिल्हा बँकेचे अध्यक्षपद, खासदारकी या माध्यमातून आपले नेतृत्व सिद्ध केले. विलासकाका उंडाळकर यांनी 1967-68 च्या सुमारास जिल्हा बँकेच्या माध्यमातून सहकार क्षेत्रात स्वत:चा प्रभाव निर्माण केला. पुढे तब्बल 53 वर्षे त्यांनी जिल्हा बँकेचे अध्यक्ष वा संचालक म्हणून काम केले.
जिल्हा बँकेच्या संचालक मंडळात काम करताना दोघांमध्ये एकमेकांचे विश्वासाचे संबंध निर्माण झाले. लक्ष्मणराव पाटील यांना जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाची संधी मिळवून देण्यात विलासकाकांनी महत्त्वाची भूमिका बजावल्याचे राजकीय जाणकार सांगतात. पुढे राजकीय परिस्थिती बदलली. लक्ष्मणराव पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. विलासकाका मात्र काँग्रेसमध्येच राहिले. दोघांचे पक्ष वेगळे झाले, तरी वैयक्तिक संबंधांमध्ये कटुता निर्माण झाली नाही. दोघांनीही पक्षीय सीमांपलीकडे जाऊन मैत्रीचे नाते जपले.
पुढच्या पिढीनेही जपले ऋणानुबंध
पुढे लक्ष्मणतात्यांचे पुत्र मकरंद पाटील यांनी आमदारकी आणि मंत्रिपदापर्यंत मजल मारली. त्यांचे बंधू नितीन पाटील यांनी जिल्हा बँक आणि संसदेत स्थान निर्माण केले. दुसरीकडे विलासकाकांचे पुत्र अॅड. उदयसिंह यांनी वडिलांचा सहकार आणि राजकारणातील वारसा पुढे नेण्याचा प्रयत्न सुरू ठेवला. मात्र, विलासकाकांच्या निधनानंतर उंडाळकर गटाला जिल्ह्याच्या राजकारणात पूर्वीसारखे स्थान मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला. या परिस्थितीत 2025 मध्ये उदयसिंह उंडाळकर यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होण्यामध्ये मकरंद पाटील आणि नितीन पाटील यांनी महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. आता जिल्हा बँकेच्या अध्यक्षपदाच्या निवडीत मंत्री मकरंद पाटील आणि खासदार नितीन पाटील यांच्या पुढाकाराने अॅड. उदयसिंह पाटील-उंडाळकर यांना संधी मिळाली आहे.
आता उदयसिंह उंडाळकर यांच्यावर आता जिल्ह्यातील सहकार क्षेत्राची मोठी जबाबदारी आली आहे. विलासकाकांनी निर्माण केलेला बँकेचा लौकिक, सहकारातील शिस्त आणि सर्वसमावेशक नेतृत्वाची परंपरा पुढे नेण्याचे आव्हान त्यांच्यासमोर आहे. राजकारणात वारसा केवळ नावानेही मिळू शकतो. मात्र, त्या नावाची प्रतिष्ठा आपल्या कर्तृत्वाने टिकवावी लागते. लक्ष्मणतात्या आणि विलासकाकांच्या मैत्रीचा वारसा जपताना उदयसिंह यांच्याकडूनही जिल्ह्याला तशाच कर्तृत्वाची अपेक्षा आहे.





