पुणे -अनेक कारणांनी काही बाळांवर जन्मत: व्यंग आढळते. हे प्रमाण तीन ते चार हजार बालकांमागे एकाला असते. हे व्यंग वेळीच लक्षात आले तर त्यावर तातडीने उपचार करता येतात. यासाठी “डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’ (डीईआयसी) सुरू करण्यात आले असून, व्यंग असलेल्या बालकांसाठी हे सेंटर संजीवनीच ठरले आहे. जीवनसत्त्वांच्या अभाव, शारीरिक आणि मानसिक विकासातील अडथळे, जन्मजात आजार अशा अनेक समस्या बाल जन्मल्यानंतर दिसून येतात. काही बालकांमध्ये ते लवकर दिसतात तर काहींचे उशिरा. परंतु या समस्या लवकर समजून त्याचे योग्य वेळेत उपचार झाल्यास या व्यंगावर काही अंशी मात करता येते. औंध जिल्हा रुग्णालयातील “डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’मध्ये गेल्या तीन वर्षांत अशाप्रकारची समस्या असलेल्या हजारभर बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. त्यापैकी सर्वाधिक बालरुग्ण हे “विकासात्मक विलंब समस्ये’ने ग्रस्त असलेले आहेत. याविषयी “आरबीएसके’चे वैद्यकीय अधिकारी डॉ. नितीन कदम यांनी माहिती दिली. बालकांच्या मानसिक-शारीरिक विकासात वाढ होण्यासाठी किंवा वाढ होत नसल्यास वेळेत निदान होण्यासाठी औंध जिल्हा रुग्णालयात “डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेंशन सेंटर’ सुरू केले आहे. आहे. यामध्ये शून्य ते 18 वयोगटांतील बालकांना जन्मत: असणारे व्यंग, जीवनसत्व अभावामुळे होणारे आजार, शारीरिक आणि बौद्धिक विकासात्मक वाढीतील आजाराबाबतच्या तपासण्या आणि उपचार केले जातात. बालरोगतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी, दंतचिकित्सक, भौतिक उपचारतज्ज्ञ, व्यवसाय उपचारतज्ज्ञ, मानसोपचारतज्ज्ञ, श्रवण आणि वाचा दोष तज्ज्ञ, आहारतज्ज्ञ यांची उपलब्धता या सेंटरमध्ये आहे. त्यांच्यामार्फत बालकाच्या तपासण्या आणि उपचार केले जात आहेत. जिल्हा रुग्णालयात 6 हजार 500 स्क्वेअर फुटांच्या जागेत हे सेंटर आहे. विकासात्मक समस्यांमध्ये शून्य ते अठरा वयोगटांतील मुलांच्या आजारांची विभागणी केली जाते. यामध्ये जन्मत:च “डेव्हलपमेंटल डिले’ म्हणजेच विकासात्मक समस्या असलेल्या बालकांची समस्या अधिक आहे. या मुलांचा वयानुसार विकास होत नसल्याने ती सामान्य मुलांच्या तुलनेत मागे पडतात. ऐकू न येणे, जन्मजात बहिरेपणा, नेत्रविकार आणि “न्यूरोमोटर इम्पिअरमेंट’ हे देखील याच प्रकारात मोडतात. या सेंटरमध्ये बालकाच्या जन्मत: असलेल्या विविध समस्यांवर उपचार केले जातात. यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांची नेमणूक केली आहे. गेल्या तीन वर्षांत सुमारे 12 हजार बालकांवर उपचार करण्यात आले आहेत. – डॉ. नागनाथ यमपल्ले, जिल्हा शल्यचिकित्सक, औंध जिल्हा रुग्णालय