मोठी बातमी! पुणे शहर लाॅकडाऊन संदर्भात आज पुन्हा महापालिका आयुक्तांकडून सुधारित नियमावली; ‘यांना’ही सूट

पुणे, दि. 6 – राज्यशासनाच्या आदेशानुसार शहरातही शुक्रवारी सायंकाळ ते सोमवारी सकाळपर्यंत कडक लॉकडाऊन असणार आहे. या काळात अत्यावश्‍यक वगळता इतर सर्व घटकांसाठी संचारबंदी असेल. मात्र, यातून उत्पादक कंपन्यांचे कामगार, दहावी-बारावी आणि इतर परीक्षा देणारे विद्यार्थी-उमेदवार तसेच पूर्व नियोजित लग्न समारंभांना परवानगी असेल.

याबाबतचे आदेश महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांनी मंगळवारी काढले. तर या आदेशात शहरातील आणखी काही व्यावसायिकांचा अत्यावश्‍यक सेवांमध्ये समावेश करण्यात आला आहे.
शहरात सोमवारी सायंकाळपासून सर्व खासगी आस्थापना तसेच कार्यालये 30 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्यासह शुक्रवारी सायंकाळी 6 ते सोमवारी सकाळी 7 पर्यंत अत्यावश्‍यक सेवा वगळता 100 टक्के संचारबंदी लागू आहे. मात्र, महापालिकेने दुसऱ्याच दिवशी या निर्णयात बदल केला आहे.

आता वीकेंडच्या संचारबंदीत महापालिका हद्दीतील परीक्षार्थींना घरापासून परीक्षा केंद्रापर्यंत या काळात प्रवास करण्यास परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी परीक्षेचे हॉल तिकिट बाळगणे आवश्‍यक असेल. ज्या औद्योगिक कंपन्यांचे कामकाज शिफ्टमध्ये चालते, त्या कामगारांना वीकेंड लॉकडाऊनच्या काळात प्रवासाला मुभा असेल. त्यांना कंपनीचे ओळखपत्र असणे बंधनकारक असेल. ज्यांचे पूर्वनियोजित लग्न समारंभ असतील, त्यांनाही 50 जणांच्या उपस्थितीचे बंधन असेल. त्या भागातील महापालिका अधिकारी तसेच पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र आवश्‍यक आहे.

मंदिरांत करता येणार विवाह

सर्व धार्मिक स्थळे नागरिकांसाठी बंद असली, तरी तेथे नियमित पूजा सुरूच असेल. या शिवाय आता तेथे विवाह तसेच अंत्यविधी संबंधित कार्यक्रमांना परवानगी देण्यात आली आहे. त्यासाठी येथेही उपस्थितीचे बंधन असेल. विवाह समारंभासाठी पोलिसांचे ना हरकत प्रमाणपत्र घ्यावे लागणार आहे. पण, या व्यतिरिक्त इतर कोणतेही धार्मिक कार्यक्रम तेथे घेण्यास मनाई आहे.

या अत्यावश्‍यक सेवा सुरू असतील
– पेट्रोलपंप व पेट्रोलियम उत्पादने
– सर्व प्रकारच्या कार्गो-कुरियर सेवा
– शासकीय आणि खासगी सुरक्षा सेवा
– मटन, चिकन, अंडी, मासे विक्रीची दुकाने सुरू राहणार
– पशु वैद्यकीय दवाखाने, पाळीव प्राणी संगोपन केंद्र, त्यांच्या खाद्यपदार्थांची दुकाने उघडणार
– शिक्षकांना ऑनलाइन शिक्षणासाठी कामाच्या ठिकाणी जाण्यास मुभा
– मेट्रो प्रकल्पाचे काम सुरूच राहणार
– सर्व प्रकारची खासगी वाहने, खासगी बसेस सोमवार ते शुक्रवार सकाळी 6 ते सायकांळी 7 पर्यंत सुरू राहतील
– बांधकाम व्यावसायिक साईट ऑफिस, आर्किटेक्‍ट ऑफिस सुरू राहणार

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.