पुणे विभागात उद्यापासून महसूल सप्ताह; विविध कार्यक्रमाचे आयोजन

पुणे – महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा, राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती मिळावी आणि त्यांना योग्य लाभ घेता यावा. तसेच शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृध्दिंगत व्हावा, या उद्देशाने आयोजित केलेल्या महसूल सप्ताहात नागरिकांना सहभागी करून घ्यावे, असे आवाहन विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी केले.
राज्य शासनाच्या वतीने दि.1 ऑगस्टपासून राज्यात महसूल सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहानिमित्त आयोजित विविध उपक्रमांचा विभागीय आयुक्तालयातून पुणे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधून आढावा घेताना ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रमेश चव्हाण, उपायुक्त वर्षा लड्डा ऊंटवाल, उपायुक्त रामचंद्र शिंदे व अन्य विभागीय प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते. जिल्हाधिकारी सातारा, सांगली, सोलापूर आणि कोल्हापूर दूरदृष्य प्रणालीद्वारे सहभागी झाले होते. शासनाच्या सर्वच उपक्रमांमध्ये पुणे विभाग नेहमीच अग्रेसर राहिला असून, महसूल सप्ताह आयोजनातही विभागाने आपला नावलौकिक टिकवावा. यासाठी विभागातील सर्व तहसीलदार, उपविभागीय अधिकारी, उपजिल्हाधिकारी तसेच महसूल कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात सक्रिय सहभाग नोंदवावा आणि उपक्रम यशस्वी करावा, असे आवाहन राव यांनी केले.
दि. 1 ते 7 ऑगस्टपर्यंत प्रत्येक जिल्ह्यात विविध कार्यक्रम
दि.1 ते 7 ऑगस्ट 2023, या कालावधीत सातही दिवसांत विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्याचे शासनाने आदेश दिले आहेत. या कालावधीत महसूल दिन साजरा करण्यासह महसूल सप्ताह शुभारंभ, युवा संवाद, एक हात मदतीचा, जनसंवाद, सैनिक हो तुमच्यासाठी, महसूल संवर्गातील कार्यरत आणि सेवानिवृत्त अधिकारी व कर्मचारी यांचा संवाद तसेच महसूल सप्ताह सांगता समारंभ इत्यादी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात यावे. यासाठी विशेष कार्यक्रमांचे कल्पकतेने आयोजन करावे, असे राव यांनी सांगितले.





