राजगुरूनगर : महसूल अधिकार्यांच्या निलंबनाविरोधात महसूल कर्मचा-यांनी राज्यभर कामबंद आंदोलन सुरु केले आह. खेड तालुक्यासह पुणे जिल्ह्यात महसूल यंत्रणा यामुळे ठप्प झाली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात 12 डिसेंबर रोजी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मावळ तालुक्यातील गौण खनिज उत्खनन प्रकरणी गंभीर दखल घेत 4 तहसीलदार, 4 मंडळ अधिकारी आणि 2 ग्राम महसूल अधिकारी अशा एकूण 10 अधिकार्यांवर ठपका ठेवत निलंबनाची कारवाई केली. या निर्णयामुळे संपूर्ण राज्यातील महसूल विभागात मोठी खळबळ उडाली आहे. ही निलंबनाची कारवाई मागे घेण्यात यावी, या मागणीसाठी महसूल विभागातील अधिकारी व कर्मचारी संघटनांनी 15 डिसेंबरपासून सामूहिक रजेवर जाऊन कामबंद आंदोलन पुकारले आहे. याचा थेट परिणाम राज्यातील महसूल यंत्रणेवर झाला असून अनेक ठिकाणी कामकाज पूर्णतः ठप्प झाले आहे. खेड तालुक्यातील ग्राम महसूल अधिकारी व मंडळ अधिकार्यांनी राजगुरूनगर येथील तहसीलदार कार्यालयात एकत्र येत जोरदार एल्गार पुकारला. यावेळी त्यांनी आपल्या डीएससी (डिजिटल स्वाक्षरी प्रमाणपत्र) पेनड्राइव्ह तहसीलदार कार्यालयात जमा करून कामबंद आंदोलन सुरू केले. पुणे जिल्ह्यातील प्रांत अधिकारी, तहसीलदार व नायब तहसीलदार यांनी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात एकत्र येत निवेदन सादर करून या आंदोलनात सहभाग नोंदवला. त्यामुळे जिल्ह्यासह तालुक्यातील महसूल यंत्रणा अक्षरशः कोलमडून पडली आहे.या आंदोलनात तहसीलदार, नायब तहसीलदार, महसूल कर्मचारी, मंडळ अधिकारी, महसूल सेवक तसेच वाहनचालक संघटना एकाच वेळी सहभागी झाल्याने प्रांत कार्यालये व तहसीलदार कार्यालयांतील संपूर्ण कामकाज ठप्प झाले आहे. महसूल विभागातील या अभूतपूर्व आंदोलनामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या दैनंदिन कामांवर मोठा परिणाम होत असून शासन या प्रकरणात कोणती भूमिका घेते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. खेड तहसीलदार व प्रांत कार्यालयातील कर्मचार्यांनी या आंदोलनात सक्रिय सहभाग घेतला आहे. लोकशाहीदिन रद्द करण्याची वेळ याच पार्श्वभूमीवर दर महिन्याच्या तिसर्या सोमवारी होणारा लोकशाही दिन मंगळवार, 15 डिसेंबर रोजी प्रांत व तहसीलदार उपस्थित नसल्याने रद्द झाला. तक्रारी घेऊन आलेले नागरिक निराश होऊन माघारी परतले. निलंबित करण्यात आलेल्या 10 अधिकारी व कर्मचार्यांवरील कारवाई मागे घेतली जात नाही, तोपर्यंत सामूहिक रजेवर जाऊन कामबंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्धार करण्यात आला आहे.