पुणे | मोसमी वाऱ्यांचा परतीचा प्रवास

पुणे, {प्रभात वृत्तसेवा} – नैऋत्य मोसमी पावसाचा महाराष्ट्रातून परतीचा प्रवास सुरू झाला असून, नंदुरबार, खारगावसह आसपासच्या जिल्ह्यातून मान्सून परतला आहे. तर राज्यातील अन्य जिल्ह्यातून मान्सून परतण्यासाठी अनुकुल वातावरण आहे.
त्यामुळे पुढील तीन ते चार दिवस वादळी वारे आणि मेघगर्जनेसह पाऊस होईल, असा अंदाज भारतीय हवामानशास्त्र विभागाने वर्तविला असून, बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे.
लक्षद्वीप लगतच्या अग्नेय व पूर्ण मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. तर उत्तर कोकण किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचे द्रोणीय क्षेत्र असल्यामुळे पुढील आठवडाभर राज्यात कमी-अधिक प्रमाणात पाऊस पडेल.
त्यामुळे परतीचा पाऊस दिलासा देणार की नुकसान करणार. सध्या नैऋत्य मोसमी पाऊस खारगाव आणि नंदूरबार परिसरातून परतला आहे. परतीचा पाऊस आणि कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील रायगड,
रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, ठाणे, मुंबई, सातारा आणि कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये पुढील तीन ते चार दिवस मेघगर्जना आणि वादळी वाऱ्यासह जोरदार तर काही ठिकाणी मध्यम पाऊस पडेल.
धुळे, नंदुरबार, जळगाव यासह विदर्भ आणि मराठवाड्यातील बहुतांश भागात विजांच्या कडकडाटात जोरदार पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तविली आहे. त्यामुळे राज्यातील बहुतांश जिल्ह्यांना यलो अलर्ट दिला आहे.
दरम्यान, गेल्या २४ तासात कोकण-गोव्यातील फोंडा परिसरात सर्वाधिक २२० मिमी पावसाची नोंद झाली. रामेश्वर येथे १२० तर म्हापसा परिसरात १०० मिमी पाऊस झाला. मराठवाड्यातील भूम येथे ४०, विदर्भातील कोरपना येथे ३० तर मध्य महाराष्ट्रात राधानगरी येथे २० मिमी पाऊस झाला.





