पुणे जिल्हा | कार्गो टर्मिनल व किसान रेल्वे पुन्हा सुरू करा

अकलूज, (प्रतिनिधी) – खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी सोलापूर जिल्ह्यात गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल उभारण्याची, बंद झालेली किसान रेल्वे पुन्हा चालू करण्यासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांची नवी दिल्ली येथे खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी भेट घेऊन मागणी केली.
सोलापूर जिल्ह्यातील सांगोला ते बिहार राज्यातील दानापूर किसान रेल्वे पुन्हा सुरू करण्याच्या संदर्भात आग्रही मागणी केली. करोना काळात केंद्र सरकारने शेतकर्यांच्या मालवाहतुकीसाठी किसान रेल्वे सुरू केली होती.
या योजनेला देशभरातील शेतकर्यांकडून चांगला प्रतिसाद मिळाला होता. सोलापूर जिल्ह्यातील शेतकर्यांनी या रेल्वेचा वापर करून दिल्ली, कोलकाता, मुझफ्फरपूर, आणि शालिमारसारख्या मोठ्या शहरांमध्ये डाळींब, द्राक्ष, केळी, पेरू, कांदा, लिंबू, आणि इतर भाज्यांचे कमी खर्चात आणि कमी वेळेत वाहतूक केली होती.
किसान रेल्वेच्या माध्यमातून शेतकर्यांचा मालवाहतुकीवरील खर्च 75 टक्के कमी झाला होता. रस्ते वाहतुकीसाठी प्रति किलोमीटर 7-8 रुपये खर्च येत असे, तर रेल्वेच्या माध्यमातून मालवाहतूक केल्यास हा खर्च प्रति किलोमीटर केवळ 2.50 रुपये इतका कमी झाला होता. त्यामुळे शेतकर्यांसाठी किसान रेल्वे फायदेशीर पर्याय बनला होता.
या पार्श्वभूमीवर, खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी केंद्र सरकारकडे किसान रेल्वे पुन्हा सुरू करण्याची आणि सांगोला, पंढरपूर, कुर्डूवाडी, केम, आणि जेऊर या स्थानकांवर या रेल्वेचे थांबे देण्याची मागणी केली आहे.
याच बरोबर सोलापूर जिल्ह्यात गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल उभारणीमुळे जिल्ह्याचा औद्योगिक विकास होईल, आणि रोजगार निर्मितीतही मोठी वाढ होईल. म्हणून, सोलापूर जिल्ह्यातील रेल्वे मार्गावर गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल उभारण्याची आपण तातडीने कारवाई करावी अशी खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांनी मंत्री वैष्णव यांना मागणी केली.
सोलापूर जिल्ह्यात औद्योगिक शेत्रात वाढ करण्यासठी आणि बेरोजगारी कमी करण्यासाठी तसेच येथील वस्त्रोद्योग, विविध कृषी उत्पादने, आणि औद्योगिक वस्त्या या ठिकाणांहून उपलब्ध होणार्या मालाच्या वाहतुकीसाठी गतीशक्ती मल्टी-मॉडेल कार्गो टर्मिनल अत्यंत उपयुक्त ठरेल.
या टर्मिनलमुळे, बियाणे, सिमेंट, स्टील, टाइल्स, कंटेनर, आणि इतर विविध वस्तूंची वाहतूक करता येईल. एक मालगाडी साधारणपणे 40-50 डब्यांची असते आणि याची हाताळणी करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर मनुष्यबळाची आवश्यकता असते. या प्रक्रियेत मजूर, सुरक्षा रक्षक, क्रेन चालक, आणि कामगारांची आवश्यकता भासेल. त्यामुळे स्थानिक पातळीवर रोजगाराच्या मोठ्या संधी उपलब्ध होतील.





