विधान परिषद निवडणुकीच्या ११ जागांचा आज निकाल: ६ जागांवर मतदानापूर्वीच बिनविरोध निवड
Maharashtra Vidhan Parishad Election Result : महायुती-महाविकास आघाडीमध्ये कुणाची सरशी?

Maharashtra Vidhan Parishad Election Result : विधान परिषदेच्या ११ स्थानिक प्राधिकारी मतदारसंघांसाठी झालेल्या निवडणुकीची आज, सोमवारी निकाल लागणार आहे. याकरिता सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरूवात झाली आहे.
राज्यातील एकूण १७ जागांसाठी निवडणूक प्रक्रिया पार पडली असून त्यापैकी ६ जागांवर उमेदवार बिनविरोध निवडून आल्यामुळे उर्वरित ११ जागांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. या निवडणुकांसाठी महायुती आणि महाविकास आघाडीकडून जोरदार तयारी करण्यात आली होती, मात्र महायुतीचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
विधान परिषदेच्या स्थानिक प्राधिकारी मतदारसंघासाठी होत असलेली ही निवडणूक महाविकास आघाडीतील उमेदवारांनी ऐनवेळी घेतलेल्या माघारीमुळे चांगलीच गाजली. या माघारीमुळे सहा जागांवर महायुतीचे उमेदवार बिनविरोध निवडून आले. तरी उमेदवारी वाटप आणि स्थानिक पातळीवरील नाराजीमुळे काही ठिकाणी बंडखोरी निर्माण झाली होती.
दरम्यान, विरोधकांपेक्षाही पक्षांतर्गत असंतोष महायुतीसाठी मोठी डोकेदुखी ठरल्याची चर्चा होती. मात्र निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात ही बंडखोरी नियंत्रणात आणण्यात महायुतीला यश आल्याचे मानले जात आहे. तरीही मतदारांचा अंतिम कौल कोणाच्या बाजूने जाणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
या निवडणुकीमध्ये कुठलाही दगाफटका होऊ नये म्हणून महायुतीचा अधिकृत उमेदवार सोडल्यास इतर कुठल्याही उमेदवाराला मतदान करू नये, अशा आशयाचा व्हिप बजावण्यात आला होता. तसेच, या व्हिपविरोधात जाऊन कुणी मतदान केल्यास त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याचे आदेशही देण्यात आले होते. या पार्श्वभूमीवर या जागांवर महायुती-महाविकास आघाडी यामधील कुणाची सरशी होते हे पहावे लागणार आहे. Maharashtra Vidhan Parishad Election Result
कुठल्या जागांची मतमोजणी ?
आज सोलापूर, जळगाव, सांगली-सातारा, नांदेड, नागपूर, भंडारा-गोंदिया, नाशिक, अमरावती, धाराशिव-लातूर-बीड, परभणी-हिंगोली तसेच छत्रपती संभाजीनगर-जालना या ११ मतदारसंघांचे निकाल जाहीर होणार आहेत.
तर ठाणे, यवतमाळ, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग, पुणे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूर आणि अहिल्यानगर या सहा मतदारसंघांमध्ये उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.
ठाण्यातून रवींद्र फाटक, यवतमाळमधून दुष्यंत चतुर्वेदी, रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्गमधून अनिकेत तटकरे, पुण्यातून विक्रम काकडे, वर्धा-गडचिरोली-चंद्रपूरमधून अरुण लखाणी आणि अहिल्यानगरमधून प्राजक्त तनपुरे यांची बिनविरोध निवड झाली आहे. Maharashtra Vidhan Parishad Election Result
हेही वाचा:





