Pimpri : अजिंठा लेणीतील धम्म यात्रेला प्रतिसाद

पिंपळे गुरव : अजिंठा लेणी येथे आयोजित करण्यात आलेल्या एक दिवसीय धम्म यात्रा सहलीस भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. ऐतिहासिक वारसास्थळ पाहून सहभागी नागरिक भारावून गेले. श्रावस्ती बुद्ध विहार, पिंपळे गुरव यांच्या वतीने या सहलीचे आयोजन करण्यात आले होते.
रविवार, (दि. १३) आयोजित केलेल्या सहलीत लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत शेकडो भाविकांनी सहभाग घेतला. भित्तीचित्र, शिल्पकला, आणि बुद्धचरित्र पाहताना बौद्ध संस्कृतीचे वैभव अनुभवण्याची संधी मिळाली. त्रिशरणपाठ, बुद्धवंदना आणि सामूहिक ध्यानाने वातावरण पावन झाले.
या प्रसंगी विहाराचे संस्थापक कैलास बनसोडे यांनी धम्माचा अर्थ स्पष्ट करत करुणा, समता व नैतिकतेचे मूल्य आत्मसात करण्याचे आवाहन केले. “ही यात्रा आत्मचिंतनाची आणि जागृतीची प्रेरणा ठरावी,” असे त्यांनी सांगितले. उत्कृष्ट संयोजन व शांत वातावरणामुळे ही सहल अध्यात्मिक उन्नतीचा अनुभव देणारी ठरली. भाविकांनी अशा उपक्रमांचे नियमित आयोजन व्हावे, अशी भावना व्यक्त केली.





