पिंपरी | शेतकरी प्रशिक्षण वर्गास इंदोरीत प्रतिसाद

वडगाव मावळ, (वार्ताहर) – महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) अंतर्गत इंदोरी येथे सोयाबीन उत्पादन तंत्रज्ञान शेतकरी प्रशिक्षण वर्गाचे आयोजन केले होते. यामध्ये सुमारे १०२ शेतकऱ्यांनी प्रशिक्षणाचा लाभ घेतला. आत्मा प्रकल्प संचालक पुणे विजय हिरेमठ आणि कृषी अधिकारी मावळ दत्तात्रेय पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशिक्षण वर्गाचे आयोजन करण्यात आले होते.
आधारकर संशोधन संस्था पुणेचे शास्त्रज्ञ संतोष जायभाय यांनी सुधारित सोयाबीन लागवड व व्यवस्थापन, विविध जाती, पेरणी लागवडीच्या विविध पद्धती, तण नियंत्रण, कीड व रोग नियंत्रण याविषयी मार्गदर्शन केले. तर शास्त्रज्ञ डॉ. बाळकृष्ण जमदग्नी यांनी ऊस लागवड तंत्रज्ञान व ऊस संजीवनी याबाबत माहिती दिली.
तसेच, कृषी विभागाच्या विविध योजना विषयी माहिती कृषी अधिकारी दत्तात्रेय पडवळ यांनी दिली. आत्मा अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या योजना, सहली व प्रशिक्षण याबाबत राहुल घोगरे यांनी मार्गदर्शन केले.
कृषी पर्यवेक्षक नवीनचंद्र बोराडे यांनी शेतकऱ्यांनी घरचे भात व सोयाबीन बियाणे वापरावे असे आवाहन केले. कृषी सहायक स्वाती घनवट यांनी सोयाबीन उगवण क्षमता, बीज प्रक्रिया, फळबाग, पी. एम. किसान योजना याविषयी माहिती दिली.





