पुणे जिल्हा | भारत बंदला बारामती शहरात प्रतिसाद

बारामती, (प्रतिनिधी)- एससी व एसटी आरक्षणाबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाच्या विरोधात पुकारण्यात आलेल्या भारत बंदला बारामती शहरात उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. दुपारी दोन वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी आपली दुकाने बंद ठेवून बंदला पाठिंबा दिला.
एससी व एसटी आरक्षणाच्या वर्गीकरणास तीव्र विरोध करीत बारामती शहरातील सर्वपक्षीय कार्यकर्ते व नागरिकांनी निषेध मोर्चा काढला.
सर्वोच्च न्यायालयाने अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती या प्रवर्गातील आरक्षणाबाबत जाहीर केलेल्या भूमिकेला विरोध करण्यासाठी भारत बंदचे आवाहन केले होते. बारामती शहरातील विविध संघटनांनी बुधवारी (दि.२१) बारामती बंदचे आवाहन केले होते. त्यानुसार सकाळपासूनच शहर व परिसरातील सर्व दुकाने बंद ठेवली होती.
शहरातील अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीतील समाज बांधवांनी सिद्धार्थनगर येथून मोर्चा सुरुवात केली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून मोर्चा इंदापूर चौक,
गुणवडी चौक, गांधी चौक, स्टेशन रोडमार्गे भिगवण चौकातून बारामती नगर परिषदेसमोरील प्रांगणात आला. यावेळी जोरदार घोषणा देण्यात आल्या. मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत झाले. यावेळी अनेक वक्त्यांनी निषेध व्यक्त केली.
मुनीर तांबोळी, अनिकेत मोहिते, ऍड. अशोक इंगुले मंगलदास निकाळजे, सचिन साबळे, काळूराम चौधरी, बापू शेंडगे, ऍड. धीरज लालबीगे, अक्षय माने, गालिंदे व पार्थ गालिंदे, विश्वास लोंढे यांनी जोरदार विरोध दर्शविला.
शुभम अहिवळे यांनी माहिती दिली, यांचेही भाषण झाले. यावेळी रिक्षा संघटनेचे अध्यक्ष प्रशांत सातव व पदाधिकाऱ्यांनी पाठिंबा दिला. यावेळी तहसीलदार गणेश शिंदे यांना निवेदन देण्यात आले. सूत्रसंचालन गौतम शिंदे यांनी केले.





