निवडणूक लढवण्यासाठी दिला शिक्षक पदाचा राजीनामा

चंदिगड – पंजाबमदील विधानसभेची निवडणूक लढवण्यासाठी दिल्लीतील एका महाविद्यालयात व्याख्यात्या म्हणून नोकरी करणाऱ्या एका शिक्षिकेने आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे.
आरुप कौर संधू असे या लेक्चरर महिलेचे नाव असून त्या दिल्लीतील गुरू तेग बहाद्दुर खालसा महाविद्यालयात इंग्रजीच्या लेक्चरर आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी झाल्यापासून संधू यांनी राजकारणात रस घ्यायला सुरुवात केली असून आता त्या संयुक्त समाज मोर्चाच्या तिकीटावर मुक्तसार येथून निवडणूक लढवत आहेत.
संधू या शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने संयुक्त किसान मोर्चाच्या संपर्कात आल्या होत्या. आंदोलनामागील हेतूंबाबत सोशल मीडियावरून प्रचार करण्यात त्यांनी विशेष आघाडी घेतली होती. आंदोलनाच्या समाप्तीनंतर संयुक्त समाज मोर्चाची स्थापना झाल्यावर त्यांनी राजकारणात सक्रिय होण्याचा निर्णय घेतला. राजकारणात येण्यापूर्वी त्या एम.फिल करत होत्या.
शेतकऱ्यांच्या 22 संघटनांनी एकत्र येऊन गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये संयुक्त समाज मोर्चा या नावाने राजकीय पक्षाची स्थापना करण्यात आली आहे. या मंचाचे नेतृत्व बलबीर सिंग राजेवाल हे करत आहेत. या पक्षाच्यावतीने शेतकरी, कार्यकर्ते, शिक्षक आणि डॉक्टरांसारख्या वेगवेगळ्या क्षेत्रातील व्यक्तींना निवडणूकीत उतरवले आहे.





