Nevasa News : राजीनामा ठरला निर्णायक; रांजणगावची सहकारी संस्था बरखास्त!

नेवासा : रांजणगांव (ता. नेवासा) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापक समितीतील कोरम अपुरा राहिल्याने संस्था बरखास्त करण्याची वेळ आली आहे. संस्थेच्या १३ संचालकांपैकी सहा संचालक थकबाकीत गेल्यामुळे सहकारी संस्था अधिनियम १९६० च्या कलम ७३ (क)(अ) अन्वये त्यांना अपात्र ठरविण्यात आले होते.
यामुळे समितीत केवळ सात संचालक कार्यरत होते. मात्र, चेअरमनच्या मनमानी कारभाराला व संचालकांना विश्वासात न घेण्याला कंटाळून संचालक बबन पंडित आल्हाट यांनी १२ जुलै रोजी सचिवांकडे राजीनामा सादर केला. त्यानंतर सचिवांनी २१ जुलै रोजी संचालक मंडळ सभेची नोटीस काढून ३० जुलै रोजी सभा बोलावली. या सभेची नोटीस सहा अपात्र संचालक व बबन आल्हाट यांनाही बजाविण्यात आलेली होती. परंतु, सात कार्यरत संचालकांपैकी केवळ तीनच सदस्य उपस्थित राहिल्याने कोरम पूर्ण झाला नाही आणि सभा तहकूब करावी लागली.
दरम्यान, बबन आल्हाट यांच्या राजीनाम्यानंतर समितीत केवळ सहा संचालक उरले आहेत. त्यामुळे समिती अल्पमतात आल्याने सहकारी संस्था अधिनियमातील कलम ७७(अ) (ब-१) नुसार संस्था बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. शासन आदेशानुसार संस्थेवर प्रशासक नेमण्यात आला असून पुढील कारभार त्यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. या निर्णयामुळे रांजणगांव व परिसरात सहकार चळवळीच्या कार्यपद्धतीवर चामगलीच चर्चा रंगलेली असून प्रशासकांच्या कारभाराकडे तालुक्याचे लक्ष लागले आहे.





