मुंबई : एकीकडे मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी (BMC Election) मतदानाचा टक्का वाढवण्याचे प्रयत्न सुरू असताना, जुहू परिसरातून मोठी बातमी समोर आली आहे. जुहू रुईया पार्क आणि कराची सोसायटी परिसरातील सुमारे 35 हजार नागरिकांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला आहे. या निर्णयाची माहिती देणारे बॅनर जवळपास प्रत्येक सोसायटीच्या गेटवर झळकत असल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 35 वर्षांपासून पुनर्विकास रखडलेला जुहू परिसरात असलेल्या मिलिटरी रडारमुळे (Military Radar) गेल्या 35 वर्षांपासून सुमारे 200 इमारती आणि दोन मोठ्या झोपडपट्ट्यांचा पुनर्विकास रखडलेला आहे. या इमारती धोकादायक अवस्थेत असून, जवळपास 35 हजार नागरिक जीव मुठीत धरून राहत असल्याचा दावा रहिवाशांकडून करण्यात येत आहे. या प्रश्नासंदर्भात रहिवाशांनी अनेकदा केंद्र सरकारच्या संरक्षण विभागाकडे तक्रारी केल्या, पाठपुरावाही केला; मात्र अद्याप कोणताही ठोस तोडगा निघालेला नाही. बॅनरमध्ये नेमकं काय म्हटलंय? जुहू परिसरात लावण्यात आलेल्या बॅनरवर SR0150 कायदा कालबाह्य असल्याचा आरोप करण्यात आला आहे. “1939 च्या ब्रिटिशकालीन कायद्याअंतर्गत आमची कायदेशीर घरे उद्ध्वस्त केली जात आहेत. 200 इमारती आणि दोन झोपडपट्ट्यांमधील 35 हजार नागरिकांवर अन्याय होत आहे. खोटी आश्वासने आता नकोत,” असा थेट इशारा बॅनरमधून देण्यात आला आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान नेत्यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले होते, मात्र निवडणुकीनंतर कुणीही दखल न घेतल्याने अखेर पालिका निवडणुकीवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे रहिवाशांचे म्हणणे आहे. मनसे उमेदवाराकडून आश्वासन मतदान बहिष्काराचे बॅनर झळकल्यानंतर प्रभाग क्रमांक 68 मधील मनसे उमेदवार संदेश देसाई यांनी परिसरातील रहिवाशांची भेट घेतली. निवडणुकीनंतर रहिवाशांना दोन्ही ठाकरे बंधूंची भेट घालून देऊन या प्रश्नाचा पाठपुरावा केला जाईल, असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. दरम्यान, मतदानावर जाहीर बहिष्कारामुळे महापालिका निवडणुकीत जुहू परिसरातील मतदानाच्या टक्केवारीवर मोठा परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.