बंगालमधील निवासी डॉक्टरांनी कामावर परतावे; सर्वोच्च न्यायालयाने दिली डेडलाइन

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी पश्चिम बंगालमधील निवासी डॉक्टरांना कामावर परतण्यासाठी डेडलाइन दिली. त्यांना उद्या (मंगळवार) सायंकाळी ५ वाजेपर्यंत कामावर रूजू होण्यास सांगण्यात आले. त्यांच्यावर कुठली कारवाई न करण्याचा आदेशही न्यायालयाने दिला. बंगालची राजधानी कोलकत्यातील रूग्णालयात प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरवर बलात्कार करून तिच्या हत्येची धक्कादायक घटना घडली.
त्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू आहे. संबंधित घटनेनंतर संपूर्ण बंगालमध्ये निदर्शनांचे सत्र सुरू आहे. त्यामध्ये सहभागी होत निवासी डॉक्टरांनी ड्युटीकडे पाठ फिरवली आहे. त्या पार्श्वभूमीवर, बंगाल सरकारच्या आरोग्य विभागाने न्यायालयात एक अहवाल सादर केला. त्यामध्ये डॉक्टर संपावर गेल्याने २३ रूग्णांचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात आला.
त्या अहवालाची दखल घेऊन न्यायालयाने निवासी डॉक्टरांना कामावर परतण्याचा आदेश दिला. बलात्कार आणि हत्या प्रकरणाचा तपास सीबीआय करत आहे. त्या केंद्रीय यंत्रणेनेही तपासाविषयीचा अहवाल सादर केला. तपास प्रगतीपथावर असल्याचे नमूद करत न्यायालयाने सीबीआयकडून १७ सप्टेंबरपर्यंत नव्याने अहवाल मागवला. तपासाविषयी सीबीआयला कुठल्या सूचना देणार नसल्याचेही न्यायालयाने सुनावणीवेळी स्पष्ट केले.





