पुणे जिल्हा | प्रतिकूलतेवर मात करताना रेश्माचे लख्ख यश

पारगाव, (वार्ताहर)- घरी शिक्षणाची पाश्र्वभूमी नसताना तसेच आई- वडिलांना फक्त कष्टाशिवाय पर्याय नाही. याची जाणीव असल्याने ऊस तोडणी मजुराच्या मुलीने प्रतिकूल परिस्थितीवर मात करीत दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळवले. उसाच्या फडात आई- वडिलाबरोबर राब राब राबणाऱ्या बीड जिल्ह्यातील रेश्माने कुटुंबाला हातभार लावत हे यश मिळविले आहे.
बीड जिल्ह्यातून गोरख आडे यांचे कुटुंबीय ऊस तोडण्यासाठी दौंड तालुक्यातील पारगाव येथे आलेले आहे. अठरा विश्व दारिद्र्य हीच त्यांची सीमा आहे. घरात कोणीच शिकलेले नाही. परंतु शिक्षणाशिवाय पर्याय नाही. याची पूर्ण जाणीव होती. हातातोंडाशी गाठ असलेल्या आडे कुटुंबीयाला मुलीला अद्ययावत साधने देता आली नाहीत. याचे शल्य होते.
रेश्मा हिला जाणीव असल्याने तिने कुठल्या ही प्रकारची शिकवणी लावली नाही. घरच्या घरी अभ्यास करीत जिद्द, चिकाटी, सातत्य, परिश्रमाच्या बळावर तिने दहावीच्या परीक्षेत ८० टक्के गुण मिळविले. तिच्या यशाने ऊसतोड मजुराच्या पालात एक ज्ञानदीप खऱ्या अर्थाने तेवला आहे.
दहावीचा अभ्यासक्रम संपल्यानंतर लगेचच रेश्मा आई वडिलांसोबत ऊस तोडण्यासाठी आली होती. परीक्षेच्या वेळी गावाकडे जाऊन परीक्षा देऊन पुन्हा ऊस तोडणीसाठी पारगावला आली. दहावीचा ऑनलाइन निकाल पाहत असताना रेश्मा ही पारगाव येथे संजय ताकवणे यांच्या उसाच्या फडात ऊस तोडीत होती.
रेश्माने घवघवीत यश मिळविल्यानंतर टोळी मालक जालिंदर ताकवणे यांनी सव्वा किलो पेढे रेश्मा हिला देऊन तिचा आनंद द्विगुणित केला. दरम्यान, ऑनलाइन निकाल समजला तेव्हा आनंद व्यक्त करण्यासाठी उसाच्या फडात कशाचे पेढे, आई वडिलांसोबत बांधावर बसून रेश्मा हिने ही ऊस खाऊन आनंद व्यक्त केला. तिचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.
पोलीस दलात नोकरी करण्याचा मानस
ऊस फड आणि कोयता हे मजुरांची रोजीरोटीचे साधन आहे. त्यातून आडे कुटुंबीयाने रेश्मा हिला शिक्षण दिले. आपल्या आई- वडिलांचे कष्ट तिने पाहिले आहे. त्यामुळे शिक्षणाची ऊर्मी तिला स्वस्थ बसू देत नव्हती. शासनाने मुलींसाठी मोफत शिक्षण योजना सुरू केली आहे. त्या योजनेचा फायदा घेऊन दहावीत यशाला गवसणी घातली. दरम्यान, पोलीस खात्यात नोकरी करून कुटुंबाला आधार देण्याचा मानस रेश्मा हिने व्यक्त केला.





