पुणे : कवी माणिक महाजन यांच्या ‘रेश्माई’ या पहिल्या काव्यसंग्रहाचे प्रकाशन आणि त्यांच्या पत्नी मालती माणिक महाजन यांचा वाढदिवस सोहळा शनिवारी (दि. ०६ डिसेंबर) रोजी पुणे येथील नांदेड सिटी, ॲम्फिथिअटर (क्रीडांगण) येथे सायंकाळी मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी कराड वैभव प्रकाशन कराड, महाजन परिवार, नातेवाईक, कुटुंबीय, मित्रपरिवार, नवचैतन्य हास्य परिवार नांदेड सिटी शाखा आणि विविध क्षेत्रांतील नामांकित मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जेष्ठ कवी, लेखक, समीक्षक अरुण व्ही. देशपांडे होते. कात्रज दूध संघ पुणेचे अध्यक्ष भगवान पासलकर, गझलकार, लेखक, कवी जयराम मुसळे आणि जेष्ठ लेखक, कवी, बालसाहित्यिक गिरीश वसेकर हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते. तसेच, दैनिक प्रभातचे महाव्यवस्थापक बी एल स्वामी, कवयित्री, लेखिका, मोहरली लेखणी समूहाच्या चिपलकट्टी, नवचैतन्य हास्य परिवाराचे करंजकर, उपाध्यक्ष भिमराव दुपारगुडे, संघ शाखा नांदेड सिटी प्रकास गोरे, संघ शाखा सरगम प्रभातचे कुकडे, मोहरली लेखणी साहित्य समूहातील कवी भुजबळ, कवयित्री जयश्री जोशी, कवयित्री लांडगे, कवी श्रीकृष्ण कुलकर्णी, कवी व्हि.के. जोशी यांच्यासह अनेक कवी-कवयित्रींची उपस्थिती लक्षणीय होती. सुमारे 100 सभासदांची उपस्थिती होती. कार्यक्रमाची सुरुवात नवचैतन्य हास्य परिवाराच्या वतीने मालती महाजन यांच्या वाढदिवसाने झाली. त्यानंतर सरस्वती पूजन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला वंदन व दीपप्रज्वलन करून औपचारिक सुरुवात झाली. पुस्तक निर्मितीविषयीचे मनोगत सिंहासने यांनी व्यक्त केले. कवी माणिक महाजन यांनी इंजिनिअरिंग क्षेत्रातून साहित्यकडे कसा प्रवास घडला, हे कवितेच्या शैलीत सांगितले. अध्यक्ष अरुण व्ही. देशपांडे यांनी प्रस्तावना लिहिताना “साहित्य सेवा ही ईश्वर सेवा आहे, माणसं हीच माझी श्रीमंती” असे गौरवोद्गार काढले. कवयित्री चिपलकट्टी यांनी माणिक महाजन अनेक काव्यप्रकार हाताळतात आणि दोन वर्षांत १५०० हून अधिक कविता करणं हे आश्चर्यकारक आहे, असे मत व्यक्त केले. भगवान पासलकर म्हणाले की, कवी महाजन यांनी आईच्या नावाने पुस्तक प्रकाशित करतानाच पत्नीच्या वाढदिवशी प्रकाशन करून दोन नात्यांचा ऋणसंतुलन साधला आहे. अध्यक्ष अरुण व्ही. देशपांडे यांनी आपल्या भाषणात ‘रेश्माई’ हा भावनिक नात्यांचा सांस्कृतिक दिनविशेष वर्णन करणारा प्रेरक काव्यसंग्रह असून कवीचे व्यक्तिमत्व कवितांतून स्पष्ट दिसते, असे सांगत पुढील काव्यसंग्रहासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे बहारदार सुत्रसंचालन साठे यांनी केले, तर प्रमोद पाटील यांनी उपस्थितांचे आभार प्रदर्शन केले. रसिकांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता आनंदमय वातावरणात झाली.