मुंबई – रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक बुधवारी सुरू झाली. 6 डिसेंबर म्हणजे शुक्रवारी सकाळी रिझर्व बँकेचे पतधोरण जाहीर होणार आहे. या अगोदर रिझर्व बँकेच्या पतधोरण समितीची बैठक आक्टोबर महिन्यात झाली होती. त्यावेळी रिझर्व बँकेने आपला रेपो हा मुख्य व्याजदर 6.5% या उच्च पातळीवर कायम ठेवला होता.
सलग दहाव्या पथधोरणात हा व्याजदर उच्च पातळीवर आहे. या रेपो दरावर रिझर्व्ह बँक व्यावसायिक बँकांना अल्पमुदतीचे भांडवल उपलब्ध करीत असते. सरकारने रिझर्व बँकेला अन्नधान्याची महागाई जास्त असली तरी त्याकडे दुर्लक्ष करून विकासदराला चालना देण्यासाठी रेपो दरात कपात करण्याचा आग्रह सूचित केला आहे.
काही खाद्यान्नांची महागाई वाढली आहे. टोमॅटो, बटाटे, कांदे महागले आहेत. मात्र यांचे दर नियंत्रण रिझर्व बँकेच्या हातात नाही. यासाठी पुरवठा साखळी मजबूत करावी लागेल. अवकाळी पाऊस आणि वाहतुकीतील अडथळ्यामुळे अन्नधान्याची महागाई 10.87 टक्क्यांनी वाढली आहे. तर भाजीपाल्याची महागाई 42.18 टक्क्यांनी वाढली आहे.
अशा परिस्थितीत विकासदर 5.4% पर्यंत कमी झाला आहे. याचा अर्थ रिझर्व बँकेने रेपोदर कमी करण्यास उशीर केला आहे असा काही विश्लेषकाकडून घेतला जात आहे. महागाई कमी करणे हे रिझर्व बँकेचे प्राथमिक कर्तव्य असले तरी विकासदर वाढता ठेवण्याची जबाबदारी रिझर्व बँकेला नाकारता येत नाही.
अमेरिका, चीन इत्यादी देशांतील व्याजदर अगोदरच कमी झाले आहेत. तेथील रिझर्व बँकांनी आणि सरकारने विकासदराला चालना देण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या आहेत. मात्र रिझर्व बँकेने व्याजदर कपातीसाठी उशीर केला आहे अशी भावना काही विश्लेषकाकडून व्यक्त केली जात आहे.