रिझर्व बँकांनी खरेदी केले 600 टन सोने ; किंमती आणखी वाढणार!

मुंबई – जागतिक अनिश्चित आर्थिक परिस्थितीमुळे विविध देशातील विशेषतः आशिया खंडातील देशाच्या रिझर्व बँकांकडून सोने खरेदी वाढली आहे. विविध देशांदरम्यान संघर्षाचे वातावरण कायम आहे. अमेरिकेत मंदीसदृश्य परिस्थितीमुळे व्याजदर कपात होणार आहे. अशा परिस्थितीत जागतिक बाजारात सोन्याचा दर नजीकच्या काळात 5,500 डॉलर व चांदीचा दर 75 डॉलर प्रति औंस या पातळीवर जाऊ शकतो.
ही माहिती मोतीलाल ओसवाल फायनान्शियल सर्व्हिसेस या कंपनीच्या अभ्यास अहवालात नमूद करण्यात आली आहे. विविध देशांच्या स्थूल अर्थव्यवस्था कमकुवत असतानाच अमेरिकेची आर्थिक परिस्थिती खराब असल्यामुळे अमेरिकेत व्याजदर कपात होणार आहे. त्यामुळे अगोदरच इतर चलनाच्या तुलनेत कमकुवत असलेला डॉलर आणखी कमकुवत होईल. त्याचबरोबर अमेरिकेच्या कर्जरोख्यावरील परतावा कमी होईल. अशा परिस्थितीत महागाईचा परिणाम होऊ नये यासाठी गुंतवणूकदार सोने आणि चांदीची खरेदी करीत आहेत.
या कंपनीचे विश्लेषक मानव मोदी यांनी सांगितले की, भारतात सध्या सोन्याचे दर 1.30 लाख रुपये या पातळीवर आहेत. रुपयाचे अवमूल्यन होत आहे. अशा परिस्थितीत नजीकच्या काळात सोन्याचा दर 1.35 लाख रुपये प्रति दहा ग्रॅम या पातळीवर जाऊ शकतो. या कालावधीत चांदीचा दर 2.3 लाख रुपयापर्यंत जाण्याची शक्यता त्यांनी व्यक्त केली.
रिझर्व बँकांकडून 600 टन सोने खरेदी –
सर्वसामान्य गुंतवणूकदारांबरोबरच रिझर्व बँका सोने खरेदी करीत आहेत. या वर्षात रिझर्व बँकांनी 600 टन सोने खरेदी केले आहे. त्याचबरोबर गुंतवणुकीसाठी सोयीच्या असलेल्या गोल्ड एक्सचेंज ट्रेडेड फंडात 450 टन सोन्याची खरेदी झाली आहे. यामुळे सोन्याचे दर इतक्या मोठ्या प्रमाणात वाढत आहेत. रिझर्व बँकांचे अनुकरण किरकोळ गुंतवणूकदार आणि इतर संस्थागत गुंतवणूकदार करीत आहेत. अशा परिस्थितीत सोन्याच्या आणि चांदीच्या दरात बेसुमार वाढ होत आहे. यामुळे इतर गुंतवणूक साधनाच्या विश्वासार्हतेवर नकारात्मक परिणाम होऊ लागला आहे.

