रिझर्व बँक व्याजदरात 0.25% कपात करण्याची शक्यता; 7 फेब्रुवारीच्या पतधोरणाकडे सर्वांचे लक्ष

मुंबई – रिझर्व बँकेने 1.5 लाख कोटी रुपयांची भांडवल सुलभता उपलब्ध केल्यामुळे बँकिंग क्षेत्रात उमेदीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचे सकारात्मक परिणाम शेअर बाजार निर्देशांकावर झाला. आता बर्याच विश्लेषकांनी रिझर्व बँक 7 फेब्रुवारी रोजी जाहीर होणार्या पतधोरणात पाव टक्के व्याजदर कपात करण्याची शक्यता असल्याचे सांगितले आहे.
महागाई 5% च्या पुढे असल्यामुळे गेल्या दोन वर्षापासून रिझर्व बँकेने आपला रेपो हा मुख्य व्याजदर 6.5% या पातळीवर कायम ठेवला आहे. यामुळे दुसर्या तिमाहित विकासदर कोसळला आहे. भांडवल सुलभतेचा अभाव आणि जास्त व्याजदर या कारणामुळे विकासदरावर परिणाम झाला असल्याचे बोलले जात आहे. या पार्श्वभूमीवर सात फेब्रुवारीच्या पतधोरणात रिझर्व बँक किमान पाव टक्के व्याजदर कपात करेल असे डीबीएस समूहाने आपल्या संशोधन विषयक टिपणात म्हटले आहे.
व्याजदरात कपात केल्यानंतर व्यावसायिक बँकांना व्याजदर कपात करण्यास बराच कालावधी लागतो. त्याना कमी व्याजदरावर ठेवी आकषीर्र्त करण्यास वेळ लागतो. हा कालावधी कमी व्हावा म्हणूनच रिझर्व बँकेने या आठवड्यात भांडवल सुलभता केली असल्याचे बोलले जाते. रिझर्व बँकेच्या नव्या गव्हर्नरनी यासंदर्भात काही संकेत दिले असल्याचे समजले जाते.
बार्कलेज या संस्थेने आपल्या टिपणात सांगितले आहे की, भांडवल सुलभता निर्माण करून रिझर्व बँकेने 7 फेब्रुवारी रोजी व्याजदरात कपात होणार असल्याचे संकेत दिले असल्याचे दिसून येते. आता रिझर्व बँक आणि अर्थमंत्रालय महागाई कमी करण्यासाठी विकासदराचा आणखी बळी देण्याची शक्यता कमी असल्याचेही बर्याच विश्लेषकानी बोलून दाखवले. विकास दर कमी झाल्यामुळे त्याचा परिणाम शेअर बाजारातील गुंतवणुकीवर होत आहे. देशातील गुंतवणूकदाराबरोबरच परदेशी गुंतवणूकदार विक्री करीत आहेत. ही घसरण रोखण्यासाठी व्याजदर कपात आवश्यक समजले जाते आहे.



