पाचगणी : महाराष्ट्राचं नंदनवन म्हणून ओळखल्या जाणाऱ्या महाबळेश्वर नगरपालिकेच्या नगराध्यक्ष पदाचं आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी जाहीर झालं आहे. त्यामुळे या पदासाठी आता चुरशीची लढत पाहायला मिळणार आहे. गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून महाबळेश्वर नगरपालिका प्रशासकांच्या अखत्यारीत होती. मात्र, आता निवडणुकीचा बिगुल वाजण्यास काहीच दिवस उरले आहेत. नगराध्यक्ष पदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर होताच शहरात राजकीय तापमान चांगलंच वाढलं आहे. महाबळेश्वर शहरातील नागरिक थेट मतदानाद्वारे नगराध्यक्षाची निवड करणार असल्याने, यावेळी निवडणूक रंगतदार होण्याची चिन्हं आहेत.