Pune | ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू नये

पुणे, – मराठा समाजाच्या आरक्षणाच्या विरोधात नाही. परंतु, ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागता कामा नये. उगाचच शिविगाळ करून घर जाळून एखाद्या समाजाला टार्गेट करण्यात अर्थ नाही. लढाई अजून संपलेली नाही. आपल्याला एकजुटीने उभे राहावे लागेल. आरक्षणाच्या संरक्षणासाठी लढाईकरीता वेळप्रसंगी रस्त्यावर देखील उतरावे लागेल, असे अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार छगन भुजबळ यांनी स्पष्ट केले.
अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेतर्फे महात्मा फुले पुण्यतिथीच्या दिवशी दरवर्षी दिला जाणारा महात्मा फुले समता पुरस्कार लेखक, दिग्दर्शक आणि अभिनेते नागराज मंजुळे यांना प्रदान करण्यात आला. त्यावेळी भुजबळ बोलत होते. समता भूमी, फुले वाडा येथे झालेल्या या पुरस्कार प्रदान सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे पुणे विभागीय अध्यक्ष प्रितेश गवळी, शहर अध्यक्ष पंढरीनाथ बनकर, महिला शहर अध्यक्ष वैष्णवी सातव तसेच आमदार हेमंत रासने, पंकज भुजबळ, योगेश टिळेकर, समीर भुजबळ, रूपाली चाकणकर, शब्बीर अन्सारी, दिलीप कांबळे, अॉड. मंगेश ससाणे, मनीषा लडकत आदी उपस्थित होते. संघर्षाशिवाय काहीही मिळत नाही. आपल्या पूर्वजांनी आपल्याला संघर्षाचा वारसा दिला असून त्या वारश्याला स्मरून आपण प्रगतीची कास धरली पाहिजे, असेही छगन भुजबळ यांनी सांगितले.
महात्मा फुले या महात्म्याची विविध मार्गांनी ओळख झाली त्यामुळेच आता सन्मार्गावर आहे. अन्यथा माझा समाज आणि कुटुंबिय देखिल अंधश्रद्धेच्या चिखलात रुतलेले होते. महात्मा फुले-आंबेडकर आणि शाहू महाराज आपले वैचारिक बाप आहेत. संविधाना सोबतच आपण साऱ्यांनी महात्मा फुले यांच्या समग्र साहित्याचे वाचन केले पाहिजे. जाती जातीमधील संकुचितता संपवून आपल्या वैचारिक बापांच्या ऋणात राहिले पाहिजे, असे मत नागराज मंजुळे यांनी व्यक्त केले. प्रास्ताविक प्रितेश गवळी यांनी यांनी केले. सूत्रसंचालन वैष्णवी सातव यांनी केले. पंढरीनाथ बनकर यांनी आभार मानले.





