Rescue Operation – काळेवाडीतील पाचपीर चौक परिसरात बुधवारी दुपारी हृदय पिळवटून टाकणारी घटना घडली. रस्त्यालगतच्या पाणीपुरवठा लाइनच्या पाइपमध्ये एका वृद्ध महिलेचा पाय अडकला आणि त्या अक्षरशः दोन तास वेदनेत तडफडत राहिल्या. अखेर पिंपरी अग्निशमन दलाच्या जवानांनी राबविलेल्या शर्थीच्या बचाव मोहिमेनंतर या महिलेची सुखरूप सुटका करण्यात आली. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनी टाळ्यांच्या गजरात जवानांचे कौतुक केले. दुपारी १२ वाजून १ मिनिटांनी मुख्य अग्निशमन केंद्राच्या नियंत्रण कक्षाला काळेवाडी पाचपीर चौकाजवळ एका वृद्ध महिलेचा पाय पाइपमध्ये अडकल्याची माहिती मिळाली. अनिल लगोरी यांनी याबाबत अग्निशमन विभागाला माहिती दिली. घटनास्थळी पोहोचल्यानंतर स्मिता भागवत कासारे (वय ६५) यांचा पाय पाणीपुरवठा लाइनवरील व्हॉल्व्ह ऑपरेशनसाठी असलेल्या सुमारे चार ते पाच फूट खोल पीव्हीसी पाईपमध्ये गुडघ्यापर्यंत अडकलेला असल्याचे समोर आले. पाय आतमध्ये वळल्याने त्यांना तीव्र वेदना होत होत्या. हालचाल करणेही अशक्य झाले होते. घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अग्निशमन विभागाने अतिरिक्त मनुष्यबळ आणि अत्याधुनिक उपकरणे मागवून घेतली. पाइपच्या आसपासची जमीन काळजीपूर्वक खोदण्यात आली. बॅटरी ऑपरेटेड ग्राइंडर कटर, हायड्रॉलिक कटर, पेट्रोल इंजिन कटर आणि पोर्टेबल कटरच्या सहाय्याने बचाव कार्य सुरू करण्यात आले. या संपूर्ण मोहिमेत सर्वाधिक भावनिक क्षण होता तो महिला जवानांचा. वेदनांनी विव्हळलेल्या कासारे यांना धीर देण्यासाठी महिला अग्निशामक जवान सतत त्यांच्याशी बोलत होत्या. “काही होणार नाही, आम्ही आहोत,” असे सांगत त्यांना पाणी पाजले जात होते. त्या बेशुद्ध पडू नयेत म्हणून सतत मानसिक आधार दिला जात होता. दरम्यान, पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जेसीबी उपलब्ध करून दिला. पोलिसांनी परिसरातील गर्दी नियंत्रित केली. स्थानिक लोकप्रतिनिधींनीही नागरिकांना बचाव कार्यात अडथळा न आणण्याचे आवाहन केले. खोदकाम करताना पाणीपुरवठा लाईन, वीज केबल किंवा पीएनजी गॅस पाइपलाइनला धक्का लागू नये यासाठी विशेष खबरदारी घेण्यात आली. त्याचबरोबर वृद्ध महिलेच्या पायाला इजा होणार नाही, याचीही दक्षता घेतली जात होती. अखेर जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने स्मिता कासारे यांची सुरक्षित सुटका केली. कोणतीही गंभीर दुखापत न होता त्या बाहेर आल्यानंतर परिसरात एकच जल्लोष झाला. नागरिकांनी टाळ्यांच्या कडकडाटात अग्निशमन जवानांचे स्वागत करत त्यांचे आभार मानले.