लोकप्रतिनिधींच्या वल्गना हवेतच विरल्या; राज्य महामार्गावर अपघातांच्या मालिका थांबता थांबेना

खेड – भिगवण-अमरापूर राज्यमार्गावर खेड येथे फूटपाथ आणि दुभाजकाचे काम मंजूर करण्यात आले असून, लवकरच हे काम मार्गी लागणार असल्याचे आ. रोहित पवार आणि खा. डॉ. सुजय विखेंनी दोन वर्षांपूर्वी दिलेले आश्वासन सपशेल हवेत विरले आहे. सध्या सुरू असलेल्या अपघातांच्या मालिकांमुळे त्यांनी दिलेल्या आश्वासनाची खेडकरांना पुन्हा पुन्हा आठवण होत आहे.
या रस्त्यावर अनेक अपघात झाले आहेत. अनेकजण कायमचे जायबंदी झाले असून, अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. रहदारीच्या या राज्यमार्गावर रस्ता सुरक्षिततेच्या सुविधा उपलब्ध नसल्याने अपघातांवर नियंत्रण आणणे कठीण बनले आहे. खेड येथे राज्यमार्गावर धोकादायक काटकोन वळण असून, या ठिकाणी मोठी रहदारी असते. त्यातच पुढे 500 मीटरवर शाळा-महाविद्यालय असल्याने शाळकरी विद्यार्थ्यांना शाळेत पाठवणेही धोक्याचे बनले आहे.
त्यामुळे या रस्त्यावर फूटपाथ आणि दुभाजक होणे अत्यंत आवश्यक होते. या सुविधा उपलब्ध होण्यासाठी ग्रामस्थांनी आ. पवार व खासदार डॉ. विखे यांच्याकडे वारंवार मागणी केली होती. त्यानंतर खेड येथे घेण्यात आलेल्या जाहीर सभेत चक्क ही कामे मंजूर झाल्याची वल्गना आ. पवारांनी केली. खा. डॉ. विखे यांच्या यंत्रणेकडून या रस्त्यावर शाळकरी मुलांसाठी व स्थानिक नागरिकांसाठी भुयारी पूल मंजूर केल्याची माहिती देण्यात आली होती.
मात्र, प्रत्यक्षात यातील कोणतेही काम आजतागायत मार्गी लागले नसून याबाबत संबंधित खात्याशी अधिक चौकशी केली असता याठिकाणी कोणतेही वाढीव काम प्रस्तावित नसल्याचे आढळून आले. लोकप्रतिनिधींनी दिलेली आश्वासने हवेत विरल्यामुळे या धोकादायक मार्गावर अपघातांच्या मालिका सुरूच आहेत.
शाळकरी विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला!
पाचवीपासून पुढील वर्गाचे शिक्षण घेण्यासाठी खेड व परिसरातील सर्व विद्यार्थी येथील विद्यालय-महाविद्यालयात येतात. वाहनांच्या वेगाचा कसलाच अंदाज या चिमुरड्यांना येत नसल्याने अनेक अपरिचित घटना घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. सध्या शाळेला सुट्या आहेत. मात्र, शाळा भरल्यानंतर राज्यमार्गावर विद्यार्थ्यांचे होणारे अपघात टाळण्यासाठी पालकांना कंबर कसावी लागणार आहे.
गतिरोधकांसाठी पालक उतरणार रस्त्यावर!
नव्याने सुरू झालेल्या राज्यमार्गावरून वाहने खूपच वेगात धावत आहेत. अनेक धोकादायक वळणावर, तसेच गर्दीच्या ठिकाणीही वाहनांचा वेग मर्यादित राहत नाही. त्यामुळे अनेक अपघात घडत आहेत. रस्त्यांवरील गर्दीच्या ठिकाणचे अपघात टाळण्यासाठी गतिरोधकांची नितांत गरज आहे. गतिरोधकांच्या मागणीसाठी आता पालक रस्त्यावर उतरून आंदोलन करणार आहेत.





