एकनाथ शिंदे यांच्यासाठी प्रतिष्ठेची निवडणूक

कल्याण लोकसभा मतदारसंघात डॉ. श्रीकांत शिंदे हे शिवसेनेकडून तर बाबाजी पाटील हे राष्ट्रवादीकडून निवडणूक रिंगणात आहेत. या मतदारसंघात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचीही भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. या मतदारसंघात आता दुरंगी लढत होणार असून ही लढत रंगतदार होणार असल्याचा अंदाज वर्तवला जात आहे. भाजप-शिवसेनेच्या युतीसाठी एकनाथ शिंदे प्रयत्नशील होते. आता युती झाल्यामुळे एकनाथ शिंदे यांनी सुटकेचा नि:श्‍वास सोडला आहे. त्यांच्या दृष्टीने त्यांचे पुत्र डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या विजयाचा मार्ग सुकर झाला आहे, पण प्रत्यक्षात त्यांच्यासाठी हा विजय खरोखरच सोपा आहे का हा प्रश्‍न आहे.

– विदुला देशपांडे 

कल्याण लोकसभा मतदारसंघावर शिवसेनेची मोठी पकड आहे. पण त्याचबरोबर भाजपनेही तेथे आपली ताकद कमालीची वाढवली आहे. भाजप-शिवसेना युती झाली नसती तर शिवसेनेला इथे विजय मिळवणे दुरापस्तच झाले असते. युती झाल्याने कल्याणचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांना हायसे वाटले आहे. ते युतीसंदर्भात अनुकूल भूमिका पहिल्यापासून मांडत होते. याला कल्याण मतदारसंघातील स्थिती हे महत्त्वाचे कारण होते. कारण युती झाली नसती तर इथे श्रीकांत शिंदे यांची खासदारकी कायम राहणे शक्‍य नाही याची जाणीव त्यांना होती. डोंबिवलीचे आमदार आणि राज्यमंत्री रवींद्र चव्हाण यांचा शिंदे यांना तीव्र विरोध होता. युती झाली नसती तर त्याचा फटका एकनाथ शिंदे यांना बसला असता.

राष्ट्रवादीचे बाबाजी पाटील यांना उमेदवारी देण्यामागेही जातीचे राजकारण आहे. या मतदारसंघातून गणेश नाईक यांना उमेदवारी देण्यात यावी, असा आग्रह राष्ट्रवादीचे स्थानिक कार्यकर्ते करत होते. राष्ट्रवादीने गणेश नाईक यांचेच निष्ठावंत मानले जाणारे बाबाजी पाटील यांना निवडणूक रिंगणात उतरवले आहे आणि जातीय समीकरण साधले आहे. या मतदारसंघातील शिळफाटा ते 27 गाव आणि अंबरनाथ, कल्याण, बदलापुरातील काही ग्रामीण भाग येथे आगरी मतदारांची संख्या मोठी आहे आणि त्यांची सहानुभूती शिवसेनेला आहे. इथे शिवसेनेला हरवणे सोपे काम नाही. वसंत डावखरे यांच्यासारख्या सामर्थ्यवान नेत्यालाही इथे शिवसेनेच्या विरोधात पराभव पत्करावा लागला होता. बाबाजी पाटील हे गणेश नाईक यांचे निष्ठावंत असले, तरी बाकी त्यांचे कर्तृत्व फारसे नाही. शिळफाटा परिसरातील देसई या गावाचे ते रहिवासी आहेत. ते जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष होते आणि ठाणे महापालिकेत नगरसेवक आहेत. कल्याण लोकसभा मतदारसंघात त्यांचे काही वैयक्तिक संबंध आहेत. शहरी भागाशी तर त्यांचा फारसा संबंधही नाही. त्यामुळे शिवसेनेपुढे ते कसे काय आव्हान उभे करू शकणार हा प्रश्‍नच आहे.

कल्याण-डोंबिवली महापालिकेत अनेक वर्षांपासून शिवसेना भाजपची सत्ता आहे. पण स्थानिक समस्या सोडवण्यात या युतीला अपयश आले आहे. शहरांचे नियोजन फसले आहे. कल्याण ते सीएसटी हा रेल्वे प्रवास अजूनही अनेक अडचणींना तोंड देत पूर्ण करावा लागतो. खासदार शिंदे यांनी त्यांच्या पातळीवर हा प्रश्‍न सोडवण्याचा प्रयत्न केला तरी स्थानिक पातळीवर शिवसेना आणि भाजप यांच्यातील कलगी तुऱ्यामुळे अनेक प्रश्‍न जैसे थे. आहे. रस्ते, पाण्याचा प्रश्‍न हे तसेच आहेत. मात्र असे असले तरी शिंदे यांनी स्थानिक पातळीवर कार्यकर्त्यांची मजबूत फळी तयार केली आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 61 हजार मतदार आहेत. गेल्या वेळी साडेसात लाख मतदारांनी मतदान केले होते. यावेळी दुपटीहून अधिक मतदार मतदानासाठी सज्ज आहेत. वाढलेल्या नवीन मतदारांचा कल कोणत्या बाजूने असेल हे पाहणेही महत्त्वाचे ठरेल. शिवसेनेसाठी हा प्रतिष्ठेचा मतदारसंघ आहे. शिवसेनेचे डॉ. श्रीकांत शिंदे हे दुसऱ्यांदा आपले नशीब या मतदारसंघात आजमावत आहेत. शिवसेनेच्या दृष्टीने हा सुरक्षित मतदारसंघ आहे. तरीही यावेळी मनसे-राष्ट्रवादी एकत्र येण्याने निवडणुकीचे गणित बदलू शकते. गेल्यावेळी मनसेला 1 लाख 22 हजार मते मिळाली होती. यावेळी मनसे निवडणूक रिंगणात नाही. पण या पक्षाने कॉंग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेस आघाडीत प्रवेश केला आहे. मनसेची मते राष्ट्रवादीच्या पारड्यात पडतील का हा प्रश्‍न आहे. काही राजकीय तज्ज्ञांच्या मते मनसेची मते शिवसेनेकडेच जातील. कारण राज ठाकरे यांच्याकडे लोक शिवसेनेच्या जवळ पाहू इच्छित होते. त्यांनी राष्ट्रवादीचा संग धरल्याने राज ठाकरे यांच्यावर प्रेम करणाऱ्या त्यांच्या चाहत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. त्यामुळे मनसेची मते राष्ट्रवादीला न मिळता शिवसेनेलाच मिळतील असा अंदाज आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात कल्याण पूर्व, कल्याण ग्रामीण, डोंबिवली, अंबरनाथ, उल्हासनगर, कळवा-मुंब्रा असे 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. त्यातील डोंबिवलीत भाजप, कल्याण पूर्वमध्ये भाजपपुरस्कृत अपक्ष, अंबरनाथमध्ये शिवसेना आणि कल्याण ग्रामीणमध्येही शिवसेना असे युतीचे चार आमदार आहेत. तर उल्हासनगर आणि कळवा-मुंब्रा येथे राष्ट्रवादीचे आमदार आहेत. पण उल्हासनगरच्या आमदार ज्योती कलानी राष्ट्रवादीच्या उमेदवारीवर निवडून आल्या असल्या तरी त्यांचा कल भाजपकडे आहे. त्यामुळे बाबाजी पाटील यांना ज्योती कलानींचा पाठींबा मिळणे अशक्‍य आहे.

कल्याण लोकसभा मतदारसंघात सुरू होत असलेली मेट्रो, रेल्वेचे विस्तारीकरण, महामार्गांचे जाळे अशी कामे युतीसाठी महत्त्वाची आहेत. राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचे कळवा-मुंब्रा विधानसभा मतदारसंघात वर्चस्व आहे, पण त्यांनी लोकसभा मतदारसंघात फारसे लक्ष घातलेले नाही. या मतदारसंघातील विविध महापालिकांवर युतीची सत्ता आहे. युतीचे एकनाथ शिंदे आणि रवींद्र चव्हाण या दोघांनी केलेली विकासकामे श्रीकांत शिंदे यांच्यासाठी लाभदायी ठरणार आहेत. सध्या तरी येथील वातावरण युतीसाठी अनुकूल आहे, असेच दिसते.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.