अहवाल! पुरूषांचे वय सरासरी 5 तर महिलांचे 4 वर्षांनी वाढण्याची शक्यता

नवी दिल्ली – येत्या २०५० पर्यंत भारतीय पुरूषांचे सरासरी वय ७५ तर महिलांचे वय ८० असेल असा निष्कर्ष एका अभ्यासानंतर मांडण्यात आला आहे. केवळ भारतातच नाही तर जगभरात पुरूषांचे वय सरासरी पाच तर महिलांचे वय सरासरी चार वर्षांनी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. द लॅन्सेटने प्रकाशित केलेल्या अभ्यास अहवालात हा दावा करण्यात आला आहे.
ज्या देशांमध्ये सरासरी आयुर्मान सध्या कमी आहे तेथे सुधारणा होण्याची शक्यता अधिक आहे. सगळ्याच भौगोलिक क्षेत्रातील नागरिकांचे वयोमान वाढणार आहे असे अभ्यासकांनी म्हटले आहे.
त्यांच्या म्हणण्यानुसार हृदयरोग, कोविड, प्रसूती आणि पोषणा संबंधातील आजार आणि अन्य संसर्गजन्य आजारांपासून बचावासाठी करण्यात आलेल्या सार्वजनिक आरोग्य उपायांमुळे लोकांचे सरासरी वयोमान वाढणार आहे. त्यामुळे जगभरात मोठ्या प्रमाणात जिवनमानात वृध्दी झाल्याचे दिसून येईल. २०२२ मध्ये वयोमानाचा सरासरी आकडा ६४.८ वर्षे होता. तो २०५० पर्यंत वाढून ६७.४ वर्ष इतका होईल.
या अभ्यासात सहभागी झालेले अमेरिकेतील वॉशिंग्टन विद्यापीठाचे क्रिस मुरे म्हणाले की जवळपासच सगळ्याच भागांतील सरासरी वयोमान वाढणार असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे एकप्रकारे याबाबतची असमानता दूर होणार आहे. आफ्रिका भागात अधिक सुधारणा होण्याची शक्यता आहे.





