पंतप्रधान मोदींच्या ‘त्या’ दाव्याला राहुल गांधींकडून प्रतिउत्तर

देशभरामध्ये सध्या १९वी लोकसभा स्थापन करण्यासाठी सार्वत्रिक निवडणुका सुरु आहेत. यंदा देशभरामध्ये ७ टप्प्यांमध्ये निवडणूक घेण्यात येणार असून यापैकी ४ टप्प्यांमधील निवडणुका आतापर्यंत पार पडल्या आहेत. येत्या ६मे’ला लोकसभा निवडणुकांचा ५वा टप्पा पार पडणार असून सर्वच राजकीय पक्षांच्या प्रमुख नेतेमंडळींनी पाचव्या टप्प्यातील मतदारसंघांकडे प्रचाराच्या तोफा वळविल्या आहेत. निवडणुकांचा ज्वर वाढू लागल्याने प्रचारसभांसहच समाज माध्यमांवरून देखील नेतेमंडळी एकमेकांवर निशाणा साधताना दिसत आहेत.

अशातच आज काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी आपल्या अधिकृत ट्विटर खात्याद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, निवडणूक प्रचारसभांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आपल्या कार्यकाळामध्ये बॉम्बस्फोटांचे प्रमाण अत्यल्प असल्याचा दावा सातत्याने करण्यात येत आहे. पंतप्रधानांच्या या दाव्याबाबत फॅक्टचेकर या वृत्तसंकेतस्थळाने पंतप्रधान नरेंद्र मोदी केंद्रात सत्तेत आल्यापासून किती दहशतवादी हल्ले झाले याबाबत एक वृत्त प्रसिद्ध केले असून या वृत्तानुसार त्यांच्या कार्यकाळामध्ये एकूण ९४२ बॉम्बस्फोट झाल्याचे सांगण्यात आले आहे.

काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी याच वृत्ताचा पुरावा देत आपल्या अधिकृत ट्विटर खात्यावर “पंतप्रधान म्हणतात 2014 पासून भारतात स्फोटांची आवाज ऐकू येत नाहीत… पुलवामा… पठानकोट .. उरी … गडचिरोली…. आणि 2014 पासून असे अन्य 942 मोठे बॉम्बस्फोट. पंतप्रधानांना त्यांचे कान उघडे ठेऊन ऐकण्याची गरज आहे.” असा संदेश लिहिला आहे.

(टीप फॅक्टचेकर या वृत्तसंकेस्थळाकडून देण्यात आलेल्या वृत्ताची पडताळणी दैनिक प्रभातने केली नाही.)

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.