खालापूर : कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघात सध्या सोशल मीडियावर राजकीय पक्षांची एकमेकांवर चिखलफेक सुरू आहे. शिवसेना (शिंदे गट) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात चांगलाच वाद पेटला आहे. याच पार्श्वभूमीवर युवासेनेच्या कार्यकर्त्यांनी सोशल मीडियावर सक्रिय राहून ‘‘आरे ला कारे’’ उत्तर देण्याचे निर्देश आमदार महेंद्र थोरवे यांनी दिले आहे. सोबतच आमदार तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असे आश्वासनही त्यांनी काऱ्यकर्त्यांना दिले. तालुक्यातील युवासेनेची आढावा बैठक रविवारी (दि. ३) खोपोलीत पार पडली. या बैठकीत बोलताना आमदार थोरवे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, युवासैनिक हा शिवसेनेचा मुख्य कणा आहे, त्यामुळे गटबाजी टाळा, संघटनेत एकसंघपणे काम करा. त्यांनी नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचे आश्वासन दिले. सर्वांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या विजयासाठी पूर्ण ताकदीने झटण्याचे देखिल आवाहन केले. तालुक्यात लवकरच युवासेनेचा भव्य मेळावा घेण्यात येणार असल्याची घोषणा आमदार थोरवे यांनी केली. या आदेशानंतर कर्जत खालापूर परिसरातील सोशल मीडियावर राजकीय डिजिटल युद्ध रंगणार असल्याची चर्चा रंगू लागली आहे. शिस्तबद्ध, सक्रिय आणि संघटीत युवासेना हा आगामी निवडणुकांमध्ये विजयाचा निर्णायक घटक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. बैठकीत सोशल मीडियाच्या प्रभावी वापराबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शनही करण्यात आले. बैठकीला आमदार थोरवे यांच्यासह शिवसेना संपर्कप्रमुख विजय पाटील, युवासेना जिल्हा अधिकारी प्रसाद थोरवे, तालुका प्रमुख संदेश पाटील, रोहित विचारे, सोनू शेलार, प्रमोद शिर्के, संदीप पाटील, देवेंद्र देशमुख, अंकुश मोरे, दिनेश थोरवे, अँड. जयेश तावडे आदी प्रमुख पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकांपूर्वीचे रणशिंग येत्या काही महिन्यांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होणार आहेत. या परिसरात जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि नगरपरिषदेची निवडणूक होणार आहे. त्यापूर्वीच स्थानिक आमदार आक्रमक झाले असल्याने यंदा निवडणुकीपूर्वी राजकीय वातावरण तापणार असल्याचे कयास बांधले जात आहेत. आमदार थोरवे यांनी कार्यकत्र्यांना सोशल मीडियावर अॅक्िटव्ह राहण्याचे आणि आरेला कारे उत्तर देण्याच्या सूचना केल्या आहेत. आता विरोधकांकडून याचे काय प्रत्युत्तर येईल याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. एकंदरीत यंदा निवडणुकीच्या आधीपासून राजकारणातील आक्रमकता वाढताना दिसून येत आहे.