Omprakash Ranka Passes Away: पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती ओमप्रकाश रांका यांचे निधन
Omprakash Ranka Passes Away: अनेक धार्मिक, सामाजिक संस्थांचा आधारस्तंभ हरपला

Omprakash Ranka Passes Away: पुण्यातील सुप्रसिद्ध उद्योगपती, रांका ज्वेलर्सचे संचालक आणि दानशूर व्यक्तीमत्व ओमप्रकाश नगराज रांका (वय ७१) यांचे गुरुवारी संध्याकाळी (२ एप्रिल) अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पार्थिवावर शुक्रवारी (३ एप्रिल) सकाळी ११ वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. ओमप्रकाश रांका यांचे पार्थिव शुक्रवारी सकाळी मुकुंदनगर येथील निवासस्थानावरुन निघेल.
प्रकृती अस्वास्थ्यामुळे बुधवारी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पश्तात मुलगा वास्तुपाल आणि दोन मुली, नातवंडे यांच्यासह मोठा परिवार आहे. पुणे व्यापारी महासंघाचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध सराफ व्यावसायिक फतेचंद रांका यांचे ते कनिष्ठ बंधू होत.
पुण्यातील सुप्रसिद्ध सराफी पेढी रांका ज्वेलर्सचा विस्तार करण्यात ओमप्रकाश यांचा सिंहाचा वाटा होता. शालेय शिक्षण संपवून त्यांनी लगेचच रविवार पेठ येथील रांका ज्वेलर्सच्या पेढीमध्ये काम करायला सुरुवात केली होती.
व्यवसायासोबतच दानशूर व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा लौकिक होता. पुणे आणि बाहेरील अनेक धार्मिक, सामाजिक संस्थांशी ते जोडलेले होते. जीतो (JITO) पुणे चॅप्टरचे माजी अध्यक्ष म्हणून त्यांनी चांगली कामगिरी केली होती.
याशिवाय, धार्मिक क्षेत्रामध्ये त्यांनी नाकोडा राजस्थानला मोठी भव्य धर्मशाळा बांधली आहे. अनेक मंदिरांची उभारणी करण्यात त्यांनी योगदान दिले होते. पुण्याजवळील भोसरी येथील गौशाळा हे त्यांच्या सामाजिक कार्यातील ठळक उदाहरण सांगितले जाते. या गौशाळेमध्ये त्यांनी खूप मोठ्या सुधारणा केल्या होत्या. सामाजिक आणि धार्मिक कार्यामध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला. गरजू व्यक्तींना मोकळ्या हाताने मदत करण्यासाठी ते प्रसिद्ध होते.


