प्रख्यात छायाचित्रकार, संस्कार भारतीचे संस्थापक सदस्य गोविंदराव खेकाळे यांचे निधन

खामगाव जि. बुलडाणा – लुप्त झालेल्या सरस्वती नदी शोध अभियानात सहभागी असणारे, जगप्रसिद्ध लोणार सरोवर वाचवण्यासाठी हायकोर्टाच्या माध्यमातून झटणारे प्रख्यात छायाचित्रकार गोविंदराव विष्णूपंत खेकाळे उपाख्य बाळासाहेब खेकाळे यांचे गुरुवारी (दि.7 जानेवारी) वृद्धापकाळाने निधन झाले. ते 87 वर्षांचे होते.

 

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक म्हणूनही बाळासाहेब खेकाळे सुपरिचित होते. संस्कार भारतीचे संस्थापक सदस्यांपैकी ते एक होते. भारतरत्न स्व. नानाजी देशमुखांच्या आदेशानुसार गोंडा येथे त्यांनी बरीच वर्षे काम केले आहे. हरिभाऊ वाकणकरांच्या सरस्वती शोध अभियानात त्यांच्यासमवेत 1985 मध्ये कार्यरत होते. छायाचित्रण आणि व्हिडिओ शुटिंगची कामगिरी त्यांना देण्यात आली होती. त्यांनी ती उत्कृष्टपणे पार पाडली.

 

 

यासोबतच स्व. मोरोपंत पिंगळे यांनी रामजन्मभूमी आंदोलनासाठी व्हिडिओ शूटिंगची जबाबदारी बाळासाहेब खेकाळे यांच्यावर सोपवली होती. त्यांनी ती जबाबदारीने पार पाडली. विशेष म्हणजे, त्यांनी आंदोलनादरम्यान केलेल्या चित्रणाच्या कॅसेट्स आज देशभर दाखवल्या जात आहेत. ते करसेवेतही सहभागी झाले होते. भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांच्या रथयात्रेचेही संपूर्ण व्हिडिओ शूटिंग बाळासाहेब खेकाळे यांनी केले आहे.

 

 

जगप्रसिद्ध लोणार सरोवर वाचवण्यासाठी ते सरकारशी सलग 20 वर्षे लढा देत होते. त्यांच्या प्रयत्नांना यश येऊन नागपूर हायकोर्टाने लोणार सरोवराच्या संवर्धनाचे आदेशही शासनाला दिले. ज्येष्ठ छायाचित्रकार म्हणून त्यांच्या कार्यासाठी ‘महाराष्ट्र फोटोग्राफर असोसिएशनने’ त्यांना जीवन गौरव पुरस्कार देऊन सन्मान केला होता.

 

 

अन्य कार्यासह बाळासाहेब खेकाळे हे विश्व हिंदू परिषद, वनवासी कल्याण आश्रमाच्या माध्यमांतूनही सतत कार्यरत होते. जीवनभर समाजासाठी कार्य करूनही ते नेहमी प्रसिद्धीपासून दूर राहिले. खामगाव येथे त्यांच्यावर दि.8 रोजी अंत्यसंस्कार करण्यात आले.

 

 

बाळासाहेब खेकाळे हे विज्ञाननिष्ठ होते. सतत प्रयोगशीलता हा त्यांचा स्थायीभाव होता. भारतात कोठेही खग्रास सूर्यग्रहण असले, तरी ते आपल्या फोटोग्राफर्सच्या ताफ्यासह हजर असत आणि अचूकपणे “डायमंड रिंग’ची टायमिंग ते साधत. त्या काळी डिजिटल कॅमेरे नव्हते. तरीही, अचूकता साधत त्यांनी ग्रहण काळातील सूर्याच्या कला कॅमेराबद्ध केल्या आहेत. गदग आणि काल्पीचे सूर्यग्रहण ही याची उदाहरणे आहेत. बाळासाहेब खेकाळे यांच्या पश्चात पत्नी शकुंतलाबाई खेकाळे, 3 मुले, 3 सुना, 2 मुली, जावई, नातवंडे, पंतवंडे असा मोठा परिवार आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.