Avinash Jadhav : नगरपालिका निवडणुकीनंतर आता स्वीकृत नगरसेवक पदाची संधी दिली जात आहे. बदलापूर कुळगाव नगरपालिकेत बदलापूरमधील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक शोषण करण्याच्या प्रकरणातील आरोपी असलेल्या तुषार आपटे याला भाजपने स्वीकृत नगरसेवक पद दिल्यानंतर राजकारण चांगलेच तापले आहे. यामुळे आता तीव्र स्वरुपाची संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी मनसेने देखील आक्रमक पवित्रा घेत आपटेचा राजीनामा घेतला नाही तर आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे. “भाजप स्वत:ला पांढरपेशा पक्ष समजतो. पण तुषार आपटेसारख्या विकृत लोकांना नगरसेवक करुन पक्षात घेतले जाते. यावरून भाजपची मानसिकता कळते.” अशा शब्दांत मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी भाजपला खडेबोल सुनावले आहेत. भाजपने तुषार आपटे याच्या स्वीकृत नगरसेवकपदाचा तातडीने राजीनामा घेतला नाही, तर येत्या 13 किंवा 14 जानेवारीला मनसे बदलापूरमध्ये मोर्चा काढेल आणि आंदोलन करेल, असे अविनाश जाधव म्हणाले आहेत. नेमकं काय म्हणाले अविनाश जाधव? “भाजप स्वत:ला पांढरपेशा पक्ष समजतो. पण तुषार आपटेसारख्या विकृत लोकांना नगरसेवक करुन पक्षात घेतले जाते. यावरून भाजपची मानसिकता कळते. मनसे अशा व्यक्तींचा निषेध करते. तुषार आपटेला ताबडतोब स्वीकृत नगरसेवक पदावरून हटवा, अन्यथा गाठ मनसेशी आहे. आपट्याच्याबाबत निर्णय बदलला गेला नाही तर बदलापूरमध्ये महामोर्चा काढला जाणार.” भाजप पक्षाला विनंती आहे की, आपटे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी निगडीत आहे म्हणून त्याला सर्व गुन्हे माफ आहेत का? त्या लहान मुलींचा विचार करा. हे भाजपच्या नेत्याच्या मुलीबरोबर झालं असतं तर त्या सोडला असतं का, असा संतप्त सवाल अविनाश जाधव यांनी भाजपला विचारला आहे. बदलापूर येथील दोन चिमुरड्या मुलींवर लैंगिक अत्याचाराच्या धक्कादायक घटनेने महाराष्ट्र हादरला होता. या प्रकरणातील मुख्य आरोपी अक्षय शिंदे याचा पोलिसांच्या चकमकित मृत्यू झाला होता. याच प्रकरणात तुषार आपटे हा सहआरोपी आहे. या प्रकरणात पोलिसांच्या तपासात शाळा व्यवस्थापनातील काही सदस्यांवर गुन्हे दाखल करण्यात आले होते. तुषार आपटे त्या काळात शाळा व्यवस्थापनात सचिव पदावर कार्यरत होता. त्याला अटकही झाली होती. मात्र, त्याला जामीन मंजूर करण्यात आला. सध्या हे प्रकरण न्यायप्रविष्ठ आहे. हेही वाचा : Hrithik Roshan Birthday: बालपणात अनेक अडचणी, ‘कहो ना… प्यार है’मुळे बदललं आयुष्य; ऋतिक रोशनचा प्रेरणादायी प्रवास