satara | म्हसवडमधील भगवान गल्लीतील रस्त्यावरील अतिक्रमणे हटवा

म्हसवड, (प्रतिनिधी) – म्हसवड नगरपालिकेने सध्या भगवान गल्ली येथील अतंर्गत रस्त्याचे काँक्रिटीकरण करण्याचे काम सुरू केलेले आहे, मात्र या रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली नाहीत. ही अतिक्रमणे तातडीने हटवावीत, अन्यथा पालिका कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरु करण्याचा इशारा ही अमोल पांडुरंग कांबळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे.
याबाबत पालिकेला दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, म्हसवड नगरपालिकेने भगवानगल्ली येथे काँक्रिटीकरण सुरू करण्यापूर्वी या येथील रस्त्यावरील असणारी सर्व अतिक्रमणे काढण्यात येतील असे सांगितले होते.
मात्र सर्वसामान्य लोकांची अतिक्रमणे फक्त काढण्यात आली, तर धनदांडग्यांच्या अतिक्रमणास येथे अभय देण्यात आले आहे. तर या रस्त्याचे निकृष्ट दर्जाचे काम कॉक्रिंटीकरण आहे.
तसेच काँक्रिटीकरणाचे लेव्हल तपासण्यात आले नसून या काँक्रिटीकरणाबाबत नागरिकांच्या तक्रारी असून सुद्धा नगरपालिका तक्रारीकडे दुर्लक्ष करीत आहेत.
याबाबत नागरिकांनी ठेकेदाराकडे विचारणा केली असता ठेकेदार उडवाउडवीचे उत्तरे देत असून स्थानिक व पुढाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे अतिक्रमण काढली नाहीत अशी तक्रार येथील नागरिकांनी केली आहे. लाखो रुपयांचे विकासकाम केवळ पुढाऱ्याच्या हस्तक्षेपामुळे निकृष्ट दर्जाचे होत असून शासनाची फसवणूक करण्यात येत आहे.





