श्रमुद कार्यकर्त्यांनी कृतीतून प्रचाराची जागवली आठवण

सातारा – सध्या निवडणुकीच्या बाजारात अनेक बिदागी बहादूर काम करीत आहेत. काहीजण देखावा करून पैसे घेऊन जात आहेत तर काही जण सुस्त पडले आहेत. अशावेळी कोणतीही अपेक्षा न ठेवता घरची चटणी-भाकरी घेऊन प्रचारार्थ बाहेर पडलेल्या श्रमिक मुक्ती दलाच्या धरणग्रस्थानी प्रचाराच्या जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे. त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

सातारा जिल्ह्यातील कोयना, धोम, बलकवडी, उरमोडी, वांग-मराठवाडी, निरा-देवधर, महू-हातगेघर, कण्हेर, तारळी, जिहे-कठापूर पाणी उपसा सिंचन योजना अशा शेतीला व पिण्याच्या पाणीसाठा करण्यासाठी सुमारे पाच लाख भूमिपुत्रांना आपल्या वडिलोपार्जित जमिनीचा त्याग करावा लागला आहे. आजही शासन स्तरावर संघर्ष करावा लागत आहे. तरीही लोकशाही मार्गाने हक्क मिळवून देण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर मतदानाचे सर्वाधिक कर्तव्य सातारा जिल्हात धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त, अभयारण्य ग्रस्त, महामार्ग ग्रस्त करीत आहेत. एवढंच नव्हे तर घरी बसून लोकशाहीचे गोडवे गण्यापेक्षा थेट निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर प्रचारात उतरून आपले म्हणणे मांडत आहेत.

कोणत्याही परिस्थितीत आमिषाला बळी न पडता घरची परिस्थिती बेताची असतानाही स्वतःची चटणी-भाकरी व पिण्याचे पाणी सोबत घेऊन येणारे धरणग्रस्त पाहून अनेकांना जुन्या काळातील निवडणुकीच्या प्रचाराची चुणूक पाहण्यास मिळू लागली आहे. काल बुधवारी दि 10 एप्रिल रोजी भर दुपारी श्रमिक मुक्ती दलाचे नेते डॉ. भारत पाटणकर यांनी साताऱ्यातील रिसॉर्ट मंडपात धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त यांचा मेळावा घेतला होता. संविधान व लोकशाही मूल्य टिकविण्यासाठी त्यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाचे उमेदवार श्री. छ. उदयनराजे भोसले यांच्या उपस्थितीत काही अटीवर भूमिका मान्य करण्यास भाग पाडले त्यानंतर जाहीर पाठींबा दिला होता. यावेळी कोणत्याही श्रमिक मुक्ती दलाच्या कार्यकर्त्यानी साधे पिण्याच्या पाण्याची सुद्धा अपेक्षा ठेवली नव्हती. जावळी, पाटण, कराड, सातारा, खंडाळा, वाई, खटाव, कोरेगाव तालुक्‍यातील श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते, धरणग्रस्त, प्रकल्पग्रस्त स्वयं प्रेरणेने मेळाव्याला उपस्थित राहून पाठिंबा देत होते. तर काही समर्थक कार्यकर्ते आलिशान वाहनातून येऊन मेळाव्याचे निरीक्षण करून इतरांना माहिती पुरवत होते.

मेळावा झाल्यानंतर ज्याठिकाणी सावली दिसत आहे त्याजागी बसून घरातील चटणी-भाकरी खाऊन धरणग्रस्थानी तृप्तीचे समाधानाने ढेकर देऊन घरची वाट धरली होती. मतदान हे श्रेष्ठ दान आहे ते कधीच विकणार नाही असा पुन्हा एकदा निर्धार केला. धरणग्रस्त किसन सुतार, रामू धोंडिबा कदम, यसाबाई घुमरे, गीताबाई पवार, शारदा पवार यांच्यासारख्या अनेक धरणग्रस्थानी सोबत भाजी, चटणी, भाकरी घेऊन प्राचारात विना अनुदानित सहभाग घेतला होता. अलिकडे संघटना, जातीजमातीच्या नावाने ओळखले जाणारे व्यवसायिक कार्यकर्ते व बिदागी घेऊन प्रचार करण्याच्या काळात श्रमिक मुक्ती दलाने सातारा जिल्हात एक आदर्श घालून दिला आहे.

यावेळी डॉ. भारत पाटणकर, डॉ. प्रशांत पन्हाळकर, श्री. छ. उदयनराजे भोसले, आ. शशिकांत शिंदे, प्रवीण धस्के, युवा नेते तेजस शिंदे, अशोक सावंत, चंद्रकांत पाटील व राजकुमार पाटील यांच्या सह राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष व श्रमिक मुक्ती दलाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यांचे आयोजकांनी आभार मानले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.