कोरेगाव, (प्रतिनिधी) – ‘जागरूक मतदार लोकशाहीचा आधार’, ‘ लक्षात ठेवा २० नोव्हेंबर’,’ मतदान अधिकार बजावा’ अशा घोषणा देत येथील मॉडर्न हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी उत्साहात मतदान जनजागृती रॅली शहरातून काढली. यावेळी मुख्याध्यापक डी. एम. साळुंखे, केंद्रप्रमुख अनिता सूर्यवंशी, जनजागृती पथकप्रमुख यशेंद्र क्षीरसागर, सदस्य मंगेश घाडगे, बीएलओ जावेद बागवान तसेच सर्व शिक्षक, शिक्षिका उपस्थित होत्या. विधानसभा निवडणुका 20 नोव्हेंबर रोजी होत आहेत आणि 23 नोव्हेंबरला निकाल आहे. या पार्श्वभूमीवर मतदान जनजागृती साठी कोरेगाव विधानसभा मतदारसंघात विविध उपक्रम राबवले जात आहेत. शंभर टक्के मतदान होण्यासाठी प्रशासनाकडून नागरिकांमध्ये जागृती करण्यात येत आहे. व्याख्याने, रांगोळी स्पर्धा, निबंध स्पर्धा, काव्य स्पर्धा आयोजित केले जात आहेत. मतदान जनजागृतीचाच एक भाग म्हणून विद्यार्थ्यांची मतदान जनजागृती रॅली कोरेगाव शहरातून काढण्यात आली. रॅलीच्या अगोदर श्री. क्षीरसागर यांनी मतदानाचे महत्त्व, विद्यार्थ्यांची भावी नागरिक म्हणून भूमिका,राज्यघटनेचे महत्त्व याविषयी विषयावर संवाद साधला. मुख्याध्यापक डी.एम. साळुंखे यांनी प्रस्तावना केली. निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांत अधिकारी अभिजीत नाईक तहसीलदार डॉ. संगमेश कोडे यांनी रॅलीच्या यशस्वीतेसाठी मार्गदर्शन केले.