– विधिषा देशपांडे रशियन अर्थव्यवस्था डबघाईला येण्याऐवजी सावरत प्रगती करताना दिसत आहे. गतवर्षात अमेरिकेपेक्षा अर्धा टक्का अधिक विकासदर राखत रशियाने जगाला धक्का दिला आहे. काय आहे यामागचे गमक? आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या मते, गेल्यावर्षी रशियाची अर्थव्यवस्था तीन टक्क्यांनी वाढली असून अमेरिकेची अर्थव्यवस्था मात्र अडीच टक्क्यांवरच अडकली आहे. युद्धाच्या निमित्ताने जगभराने निर्बंध लादलेले असताना रशियाची अर्थव्यवस्था मात्र दिवसेंदिवस सक्षम होत आहे. युक्रेनशी दोन वर्षांपासून लढाई सुरू आहे. जागतिक पातळीवर सातत्याने अडथळे येऊनही रशिया हार मानण्यास तयार नाही. जानेवारीत रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांनी रशिया युरोपातील आघाडीची अर्थव्यवस्था बनल्याचे जाहीर केले. खुद्द संयुक्त राष्ट्राच्या नाणेनिधीने जी-7 देशांत रशियाची अर्थव्यवस्था ही सर्वोत्तम राहिल्याचे मान्य केले. जी-7 मध्ये जगातील सर्वात शक्तिशाली देश आहेत. पुतीन यांच्या मते, देशाचा जीडीपी हा जगातील पाच बळकट देशांत सामील झाला आहे. अर्थात दोन वर्षांपासून लढाई करणारा रशिया गर्भश्रीमंत कसा झाला? याचे सर्वांना आश्चर्य वाटत आहे. दोन वर्षांपूर्वी रशिया आणि युक्रेन यांच्यात युद्ध सुरू झाले. या काळात लहान किंवा बडे देश असो, त्यांनी रशियाला रोखण्यासाठी निर्बंध घालण्याची चढाओढ सुरू केली. पुढील दोन वर्षांत दहा हजारांपेक्षा अधिक निर्बंध लादले. अनेक देशांनी एकत्र येत रशियाचे अध्यक्ष किंवा अन्य नेत्यांना आपल्याकडे येऊ द्यायचे नाही, असे ठरवले. हे एकप्रकारे राजनैतिक निर्बंध असून त्यामुळे द्विपक्षीय संबंध बिघडतात. अशा स्वरुपाच्या आंतरराष्ट्रीय बंदीचे थेट परिणाम हे युद्धापेक्षा अधिक सहन करावे लागतात. निर्बंधामुळे एकाकी पडलेले देश कालांतराने पराभव मान्य करतात. एकप्रकारे चुकीचे काम केल्यास समाज एखाद्या कुटुंबाला जसे वाळीत टाकण्यात येते, तेच धोरण आंतरराष्ट्रीय पातळीवरही लागू केले जाते. युक्रेनवर आक्रमण केल्याने अमेरिकेसह अनेक देशांनी रशियावर व्यापारी निर्बंध घातले आणि हा सर्वात परिणामकारक मार्ग मानला जातो. यानुसार संबंधित देशांशी कोणत्याही प्रकारचा व्यापार, देवाणघेवाण होत नाही. ब्रिटनने देखील रशियाच्या बँकांना आपल्या आर्थिक व्यवस्थेतून बाजूला काढले आहे. रशिया बँक ब्रिटनच्या बँकेशी व्यवहार करू शकत नाही. एवढेच नाही तर सामान्य रशियन नागरिक ब्रिटनच्या बँकेतून अधिक पैसे काढू शकत नाही. अशा बहिष्कृत तंत्रामुळे नाराज नागरिक आपल्या सरकारवर दबाव आणतील, असे गृहित धरलेले असते. औद्योगिक घराण्यांना ङ्गटका रशियाच्या बहुतांश औद्योगिक घराण्यांना आर्थिक नाकेबंदीचा सामना करावा लागत आहे. या घराण्यांमुळे रशियाच्या अर्थव्यवस्थेचा गाडा सुरू आहे. या घराण्यांचे रशियाचे अध्यक्ष ब्लादिमीर पुतीन यांच्याशी चांगले संबंध आहेत. अशावेळी आंतराष्ट्रीय समूहाकडून औद्योगिक घराण्यांना वेठीस धरल्याने त्यांच्या दबावाने पुतीन आपल्या सैन्यांना माघारी ङ्गिरण्याचे आदेश देतील, असा कयास मांडला गेला. मात्र इतके निर्बंध लादूनही रशियात असे काहीच घडताना दिसत नाही. नुकसान कसे रोखले? आयात कमी झाल्यामुळे नुकसान होण्याऐवजी रशियाचा ङ्गायदाच होत आहे. पूर्वी खाण्यापिण्याच्या वस्तू निर्यात केल्या जात होत्या. त्याच वस्तू आता देशातच वापरल्या जात आहेत. युद्धाच्या कारणांमुळे किमती स्थिर आहेत. याप्रमाणे रशियाच्या तिजोरीत पैसा येत आहे. याशिवाय मोठे ब्रँड्स रशियातून जाण्यास तयार नाहीत. ‘न्यूयॉर्क टाइम्स’च्या एका बातमीनुसार रशियन नागरिक भरपूर खर्च करत आहेत. यामागचे कारण म्हणजे इंटरनॅशनल कंपनीने मांडलेले बस्तान. रशियन नागरिकांची खरेदी क्षमता चांगली आहे आणि ते अजूनही ब्रँड्सवर खर्च करत आहेत. स्वस्तात कंपन्यांची खरेदी युद्धामुळे काही कंपन्यांनी रशियातून गाशा गुंडाळला. मात्र त्या कंपन्यांची खरेदी पुतीन आणि स्थानिक श्रीमंतांनी स्वस्तात केली. उदाहरणार्थ, स्टारबक्सचे नाव आता स्टार्स कॉङ्गी झाले आहे. क्रिस्पी क्रीम नावाची कंपनी आता क्रंची ड्रीम म्हणून ओळखली जात आहे. काही खासगी कंपन्या सरकारनेच खरेदी केल्या आहेत. हे व्यवहार वाजवी किमतीत झाले आहेत. याशिवाय ज्या कंन्यांनी रशियातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला, त्यांच्यावर रशियाने भरपूर कर आकारला. परिणामी त्या कंपन्या तोट्यात गेल्या. परंतु सरकारच्या तिजोरीत बक्कळ पैसा आला. नुकसान सहन करत कंपन्या देशाबाहेर गेल्या खर्या, परंतु रशियाचे बॅलेन्स वाढले. एकुणातच रशियाचे गणित एवढे अचूक ठरले की युद्ध आणि निर्बंधाचा कोणताही परिणाम देशावर झाला नाही. उलट त्यांनी या संकटात संधी साधली. अन्य देशांमार्ङ्गत कच्चा माल एखाद्या उत्पादनासाठी कच्च्या मालाची गरज भासते. युद्धामुळे काही देशांनी रशियाशी व्यापार करताना हात आखडता घेतला. यावरही पुतीन यांनी तोडगा काढला. गेल्या दोन वर्षांत अर्मेनिया, सर्बिया, कझाकिस्तान यांसारख्या देशांनी युरोपातून सर्वाधिक कच्चा माल खरेदी केला. पूर्वी असे घडले नव्हते. मात्र या आयात वस्तू अन्य कोठे नाही तर रशियात पाठविल्या जात होत्या. या देशांशी रशियाचे चांगले संबंध आहेत. ते पूर्वी सोव्हियत संघाचाच अविभाज्य भाग होते. या बदल्यात त्यांना कोणता ना कोणता राजकीय लाभ मिळत आहे.