शिरूर भूमिअभिलेख कार्यालयाची उल्लेखनीय कामगिरी, पुणे विभागात तृतीय क्रमांक

शिरूर : राज्य शासनाच्या ‘१०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात’ शिरूर तालुक्यातील भूमिअभिलेख कार्यालयाने पुणे विभागात तृतीय क्रमांक पटकावून उल्लेखनीय यश मिळवले आहे. या उपक्रमात राज्यातील ३५८ तालुक्यांतील सुमारे १०,००० शासकीय कार्यालयांनी सहभाग घेतला होता. कार्यप्रणालीत पारदर्शकता, वेगवान सेवा वितरण, नागरिकाभिमुख दृष्टिकोन आणि नवोपक्रमांची अंमलबजावणी हे या उपक्रमाचे प्रमुख उद्दिष्ट होते.
पुणे विभागातील २५ प्रशासकीय विभागांनी या कार्यक्रमात सहभाग नोंदवला. यामध्ये भूमिअभिलेख विभागाने विशेष उत्साह आणि गुणवत्तेसह आपली कामगिरी सिद्ध केली. शिरूर तालुक्याच्या भूमिअभिलेख कार्यालयाने ६५ स्पर्धक कार्यालयांमधून तिसरा क्रमांक मिळवत आपली क्षमता दाखवून दिली.
सेवा सुलभता आणि डिजिटायझेशनवर विशेष भर –
यशस्वी कामगिरीसाठी शिरूर भूमिअभिलेख कार्यालयाने नागरिकांना सेवा सुलभ करण्यावर लक्ष केंद्रित केले. डिजिटायझेशन, वेळेवर नोंद आणि नकाशा वितरण, कार्यालयाची स्वच्छता आणि सकारात्मक कार्यसंस्कृती यामध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या. या प्रयत्नांमुळे कार्यालयाने नागरिकांचा विश्वास जिंकला आणि उल्लेखनीय प्रगती साधली.
“हे यश शिरूर भूमिअभिलेख कार्यालयातील सर्व कर्मचाऱ्यांच्या अथक मेहनतीचे आणि सेवाभावी दृष्टिकोनाचे फलित आहे. त्यांच्या प्रयत्नांना सलाम,” असे मत उपअधीक्षक अमोल भोसले यांनी व्यक्त केले. या यशामुळे शिरूर भूमिअभिलेख कार्यालयाने केवळ तालुक्याचेच नव्हे, तर संपूर्ण पुणे विभागाचे नाव उज्ज्वल केले आहे.





